सिंधुदुर्ग जिल्हा तापाने फणफणतोय, शेकडो रुग्ण सर्दी, ताप, खोकल्याने बेजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 02:26 PM2019-08-05T14:26:07+5:302019-08-05T14:28:28+5:30
वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलाच्या परिणामाने सिंधुदुर्ग जिल्हा तापाने फणफणल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालय, आरोग्य केंद्र तथा खासगी दवाखान्यांत होत असलेल्या रुग्णांच्या गर्दीवरून दिसत आहे. सद्यस्थितीत शेकडो रुग्ण सर्दी, ताप, खोकल्याने बेजार झाले आहेत.
सिंधुदुर्गनगरी : वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलाच्या परिणामाने सिंधुदुर्ग जिल्हा तापाने फणफणल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालय, आरोग्य केंद्र तथा खासगी दवाखान्यांत होत असलेल्या रुग्णांच्या गर्दीवरून दिसत आहे. सद्यस्थितीत शेकडो रुग्ण सर्दी, ताप, खोकल्याने बेजार झाले आहेत.
जिल्हा रुग्णालयात शनिवारी दुपारी बारा वाजेपर्यंत विविध आजारांचे ४५० रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. दरम्यान, ही सर्व स्थिती पाहता जिल्ह्यातील जनतेने घाबरून न जाता काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजारो तापाचे रुग्ण आढळले आहेत. डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण आढळले नसले तरी साध्या तापाने बहुतांशी जण हतबल झाले आहेत. हवामानातील विलक्षण बदलाने जिल्ह्यात तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे.
जिल्ह्यातील जिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयांसह आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांत तापाने फणफणलेले रुग्ण दाखल होत आहेत. बहुतेक रुग्ण खासगी दवाखान्यात दाखल होऊन उपचार करून घेत आहेत. काही रुग्णांना शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयात दाखल करून घेतले आहे. या तापसरीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी जनतेला तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
- ताप आल्यास तत्काळ नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल होऊन रक्त तपासणी करा. शेतीची कामे करताना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी यावेळी आवाहन केले आहे.
केसपेपर, औषधांसाठी रांगाच रांगा
ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास ४५० रुग्णांनी तपासणीसाठी नोंद केली होती. यात बहुतांशी रूग्ण हे सर्दी, ताप, खोकल्याचे होते. दुपारी एक वाजेपर्यंत बाह्यरुग्ण विभाग सुरू असल्याने केसपेपर काढण्यासाठी रुग्णांची रांग लागली होती. तर तपासणी करून आलेले रुग्ण रांगेत राहून औषधे घेत होते.