कणकवली : शासकीय योजना राबवित असल्याचा फक्त ' फ़ार्स ' उभा करु नका. प्रत्यक्ष काम करा. अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही.असा इशारा पंचायत समिती सदस्यानी गुरुवारी झालेल्या मासिक सभेत कृषी अधिकाऱ्यांना दिला.कणकवली पंचायत समितीची मासिक सभा प.पू.भालचंद्र महाराज सभागृहात सभापती भाग्यलक्ष्मी साटम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती दिलीप तळेकर, गटविकास अधिकारी मनोज भोसले उपस्थित होते.या सभेत प्रामुख्याने कृषी विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा मुद्दा चर्चेत आला. पंचायत समिती सदस्य मनोज रावराणे यांनी कृषी विभागामार्फत तालुक्यात घेण्यात आलेल्या औषध फवारणी विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठीच्या मेळाव्याचा प्रश्न उपस्थित केला होता. लोरे येथे झालेल्या मेळाव्यात 17 जण उपस्थित होते. त्यातील कितीजण शेतकरी होते? असा सवाल त्यानी कृषी अधिकारी पाचपुते यांना विचारला.
औषध फवारणीबाबत मार्गदर्शनासाठी कृषि विभागाकडून शेतकऱ्यांसाठी तालुक्यात मेळाव्याचे आयोजन केले गेले होते. मात्र, त्याची माहितीच शेतकऱ्यांपर्यत पोहचत नसेल तर असे मेळावे घेण्याचा उद्देश सफल कसा होणार ? असा प्रश्न उपस्थित करतानाच फक्त शासकीय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी असे मेळावे घेतल्याचे कागदोपत्री दाखवू नका.
या मेळाव्याबाबत त्या परिसरातील सर्व शेतकऱ्यांना माहिती का देण्यात आली नाही ? असेही त्यानी विचारले.इतर सदस्यानीही या मुद्यावरून कृषी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. 'आत्मा' समिती सदस्यानाही काही मेळाव्याबाबत माहिती दिली जात नाही .असे का? असा प्रश्न उपस्थित करतानाच यापुढे पुन्हा असे घडल्यास आम्ही गप्प बसणार नाही. आमच्यासाठी जनतेचे हित महत्वाचे आहे. त्यांच्यापर्यन्त परिपूर्ण माहिती पोहचली पाहिजे. याची दक्षता घ्या असे अधिकाऱ्यांना सुनावले.सभापती भाग्यलक्ष्मी साटम यांनी पंचायत समिती सदस्य ,सरपंच तसेच गावातील इतर लोकप्रतिनिधीना विश्वासात घेवून योजना राबवा असे यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले.दहा पेक्षा कमी पटसंख्या व दोन शाळांमधील अंतर अशा निकषाच्या आधारे कणकवली तालुक्यातील 43 शाळा बंद करण्याबाबतची सुचना उपसंचालकांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावरुन प्राप्त झाल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर यांनी दिली. तसेच या सुचनेनंतर आपल्या विभागाने संबधित शाळांची पहाणी केल्यानंतर संबधित निकषात फक्त 39 शाळाच बसत असल्याचे निदर्शनास आले आहे.
बेर्ले- शेर्पे शाळा , लोरे बांबरवाडी शाळा , नांदगाव वाघाचीवाडी शाळा तसेच फोंडा ब्रह्मनगरी शाळा या उर्वरित चार शाळांपैकी दोन शाळांतील पटसंख्या आता वाढली आहे. यामध्ये नांदगाव वाघाचीवाडी शाळा तसेच फोंडा ब्रह्मनगरी शाळा यांचा समावेश आहे. याची माहिती वरिष्ठ स्तरावर कळविण्यात आल्याचे किंजवडेकर यांनी यावेळी सांगितले.पशुसंवर्धन विभागाला दिलेल्या कामकाजाच्या उद्दीष्टापैकी लसिकरणाचे उद्दिष्ट दहा टक्केच पूर्ण झाले आहे. लस उपलब्ध नसल्याने जनावरांचे लसिकरण होऊ शकले नसल्याची माहिती डॉ . विठ्ठल गाड यांनी दिली. तर फक्त शेतकऱ्यांचा दूरध्वनी आल्यावरच लसिकरण करायला जावू नका.
जनावरे एखाद्या साथीने दगावली तर त्याला जबाबदार कोण ? असा प्रश्न सदस्यानी यावेळी उपस्थित केला. तसेच लसिकरण व इतर कामकाजाचा परिपूर्ण आढावा पुढील सभेत द्या अशी मागणीहि यावेळी करण्यात आली.लघुपाटबंधारे विभागाकडून यापुढे अंगणवाडीचे काम पूर्ण नसेल तर संबधित मक्तेदाराचे देयक अदा करण्यात येवू नये. काम अपूर्ण असताना देखील झालेल्या कामाचे देयक मक्तेदाराला दिल्याने निविदेत नमूद सर्व कामे पूर्ण होत नाहीत. त्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागतो.तसेच निधिहि शिल्लक रहातो . असा मुद्दा मनोज रावराणे यांनी उपस्थित केला असता यापुढे याबाबत काळजी घेण्यात येईल असे उपअभियंता महाजन यांनी सांगितले.आरोग्य विभागातील कर्मचारी काम करीत नसतील तर त्यांच्यावर तत्काळ कारवाई करा अशी मागणी सदस्यानी सभेत केली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कुबेर मिठारी यांनी ,अशी कारवाई केल्यास तुमच्यासारखे लोकप्रतिनिधिच कर्मचाऱ्यांची रदबदली करण्यासाठी आपल्याकडे येत असल्याचे सांगितले.तसेच त्यामुळे कामकाज करताना अडचण येत असल्याचेही ते म्हणाले.फोंडाघाट पोलिस पाटील पद तत्काळ भरण्यात यावे अशी मागणी सुजाता हळदिवे यांनी केली. एमआरजीएस अंतर्गत शेतपाटांचे काम करण्यात यावे अशी मागणी मनोज रावराणे यानी केली. तर याबाबत वरिष्ठस्तरावरून मार्गदर्शन मागविले असल्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितले. गणेश तांबे तसेच इतर सदस्यानीही विविध मुद्दे यावेळी उपस्थित केले.निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पूरविणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा!तालुक्यात निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरविल्याची घटना उघड झाली आहे. मुलांच्या जिवनाशी निगडीत हा विषय असून त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन संबधित ठेकेदारावर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी सदस्यानी या सभेत केली. सभापती साटम यांनीही या मागणीला दुजोरा दिला. त्यानंतर याबाबत आपण जिल्हा परिषदेच्या उप मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांशी सभा संपल्यानंतर लगेचच बोलतो असे गटविकास अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.