सिंधुदुर्ग : कासार्डेतील महिलांचा दारूबंदीसाठी एल्गार, आठशे महिलांनी ग्रामसभा गाजवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 11:16 AM2018-03-10T11:16:01+5:302018-03-10T11:16:01+5:30
कणकवली तालुक्यातील कासार्डे गावात सुरू असलेला बिअरबार तसेच अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतल्याने महिलांचा आक्रोश जागतिक महिला दिनी आयोजित खास ग्रामसभेत दिसून आला. गावात दारूबंदी करण्यासाठी खास ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त जागतिक महिला दिनी गावातील अत्यंत संवेदनशील विषयावार महिलांची आक्रमकता दिसून आली.
सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यातील कासार्डे गावात सुरू असलेला बिअरबार तसेच अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतल्याने महिलांचा आक्रोश जागतिक महिला दिनी आयोजित खास ग्रामसभेत दिसून आला. गावात दारूबंदी करण्यासाठी खास ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त जागतिक महिला दिनी गावातील अत्यंत संवेदनशील विषयावार महिलांची आक्रमकता दिसून आली.
कासार्डेतील महिलांनी दारूबंदी साठी आयोजित केलेल्या महिला ग्रामसभेला महिलांचे घोषणा देत ग्रामपंचायतमध्ये आगमन झाले. यावेळी दारूबंदीचे समर्थन करणारा फलक हातात होता.
कासार्डे ग्रामपंचायतीने दारू विक्री संदर्भात आयोजित ग्रामसभेला महिलांनी सकाळपासून गर्दी केली होती. कासार्डे गावातील २२ वाड्यांतील महिलांनी मिळेल त्या वाहनांनी ग्रामसभेला हजेरी लावण्यासाठी हातात दारूबंदीचे फलक घेऊन सभागृहात प्रवेश केला. त्यानंतर मतदार ओळख पटविल्यानंतर ख-या अर्थाने ग्रामसभेला सुरूवात झाली.
प्रारंभी उपस्थितीत ग्रामस्थांचे पंचायत समिती सदस्य प्रकाश पारकर यांनी स्वागत करून सभेची सुरूवात केली. सरपंच बाळाराम तानवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी अमित पाडळकर, पंचायत समितीचे निरिक्षक पवार, पोलिस अधिकारी, तसेच जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, ग्रामविकास अधिकारी प्रविण कुडतरकर, दारूबंदी समिती अध्यक्षा तथा कासार्डे उपसरपंच पूजा जाधव, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष सावंत, पोलीस पाटील महेंद्र देवरूखकर, माजी जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया पाताडे, मानसी वाळवे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
सभेला एकूण ३३६३ मतदारांपैकी १६६३ मतदार ग्रामस्थ उपस्थित राहणे आवश्यक होते. पण ८५२ मतदार उपस्थित राहिल्याने कोरम अभावी ही सभा तहकूब करण्यात आली. या सभेत ग्रामविकास अधिकारी प्रविण कुडतरकर यांनी ही कायदेशीर विषयावर ग्रामसभेला विशेष मार्गदर्शन केले.
दारूबंदी झालीच पाहिजे
शेवटी शासनाची भूमिका व नियम काहीही असोत कासार्डे गावात दारूबंदी झालीच पाहिजे ही आग्रही भूमिका दर्शना पाताडे यांनी माडून सदरचे बिअरशॉपी व दारूविक्री बंद करण्याबाबत आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ येऊ देऊ नये असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.