- शीलेश शर्मानवी दिल्ली : सिंधुदुर्ग विमानतळावरून जानेवारीच्या अखेरच्या सप्ताहात विमानांची उड्डाणे सुरू होतील, अशी माहिती नागरी विमान वाहतूकमंत्री हरदीप एस. पुरी यांनी दिली आहे.सुरेश प्रभू यांना लिहिलेल्या ताज्या पत्रात पुरी यांनी म्हटले की, सिंधुदुर्गच्या चिपी ग्रीन फिल्ड विमानतळाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. डीजीसीएच्या पथकाने त्याची पाहणीही केली आहे. त्यानुसार आता विमानतळास परवाना दिला जाईल. एटीसी मनोरा आणि हवामानविषयक माहिती निश्चित करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान संयंत्राची तात्काळ उभारणी करण्याच्या सूचना डीजीसीएच्या पथकाने विमानतळ उभारणी करणाऱ्या कंपनीस दिल्या आहेत. अग्निशामक उपकरणे आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सूचनाही कंपनीस केल्या आहेत. या विमानतळाच्या उभारणीचे काम आयआरबी सिंधुदुर्ग एअरपोर्ट प्रा. लि. या कंपनीकडे देण्यात आलेले आहे. उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा कंपनीस जानेवारीपर्यंत पूर्ण करावयाच्या आहेत. पुरी यांच्या पत्रात म्हटले आहे की, अलायन्स एअर या कंपनीला उड्डाणाची परवानगी देण्यात आली आहे. येथील सर्व उड्डाणे आरसीएस उड्डाण योजनेनुसार होतील.सुरेश प्रभू विमान वाहतूक मंत्री होते, तेव्हा त्यांनी या विमानतळासाठी प्रयत्न केले होते. सिंधुदुर्गातून लवकरात लवकर विमान उड्डाणे सुरू व्हावीत, यासाठी ते आजही प्रयत्नशील आहेत.
सिंधुदुर्ग ग्रीन फिल्ड विमानतळ जानेवारीअखेरीस होणार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 2:20 AM