सावंतवाडी : रूग्णालयापर्यंत औषधे पोहोचण्यासाठी वेळ लागत आहे. लवकरच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिला आहे. ते सावंतवाडी पत्रकार परिषदेत बोलत होते.
उच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे सध्या केंद्र व राज्य सरकार हाफकीन इन्स्टिट्यूटकडून औषधे खरेदी करत आहेत. त्यामुळे रूग्णालयापर्यंत औषधे पोहोचण्यासाठी वेळ लागत आहे. मात्र जिल्हास्तरावर औषध खरेदीचे अधिकार शल्यचिकित्सकांना दिले आहेत. मात्र, त्यात जर अधिकारी वर्ग कामचुकारपणा करीत असतील तर ते योग्य नाही. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास शासन कुठेही कमी पडणार नाही.
यावेळी उपवनसंरक्षक समाधान चव्हाण, तिलारीचे कार्यकारी अभियंता राहुल धाकतोड, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार सतीश कदम, ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो, अशोक दळवी, राघोजी सावंत, बबन राणे आदी उपस्थित होते.केसरकर म्हणाले, जनआक्रोश आंदोलनाचे श्रेय कोण घेते याच्याशी मला कोणतेही देणेघेणे नाही. पण हा प्रश्न सुटावा म्हणून मी गेले एक वर्ष प्रयत्न करीत आहे. सतत गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या संपर्कात होतो. ज्या दिवशी गोव्याचे आरोग्यमंत्री महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यास मुंबईत आले होते, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी मलाही सांगितले होते. पण मी विधानसभेत असल्याने गेलो नाही.
सिंधुदुर्गच्या जनतेकरिता जेवढे काही आरोग्याच्या बाबतीत करता येईल तेवढे आम्ही करू. ती आमची जबाबदारी आहे, असे यावेळी मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले. मात्र,महात्मा फुले आरोग्यदायी योजनेचा लाभ सिंधुदुर्गमधील रूग्णांना होण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत.
जिल्ह्यात एक सुसज्ज असे मल्टिस्पेशालिटी रूग्णालय उभे राहत असून, ते रूग्णालय उभे होईपर्यंत जिल्ह्यातील दोडामार्ग, कुडाळ, शिरोडा, देवगड अशा रूग्णालयांना उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा देण्यात आला आहे. तसेच या रूग्णालयांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही मंत्री केसरकर यांनी जाहीर केले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांशी रूग्णालयात औषधांचा तुटवडा आहे. ही वस्तुस्थिती असून, उच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे हाफकीन इन्स्टिट्यूटकडून औषधे खरेदी करावी लागत आहेत. त्याला काही कालावधी लागत असून, या कालावधीत औषधांचा तुटवडा भासू नये यासाठी खास बाब म्हणून जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र मार्च संपल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक औषधांचा तुटवडा सांगत असतील तर ते योग्य नाही. त्यांची या संपूर्ण प्रकरणात चौकशी करण्यात येणार आहे.प्रभू, मुणगेकरांसारखे राणेंनी काम करावेयापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॉ. भालचंद्र मुणगेकर, सुरेश प्रभू, एकनाथ ठाकूर असे अनेक जण राज्यसभेवर गेले आहेत. त्यांनी आपल्या कार्याचा ठसाही राज्यसभेत उमटवला आहे. त्यांच्यासारखेच काम माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी करावे, असा उपरोधिक टोला मंत्री केसरकर यांनी हाणून नारायण राणेंना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
राणेंच्या रूग्णालयाला लाभ देणारआरोग्यदायी योजनेचा लाभ माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजला मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही सकारात्मक आहोत. आरोग्यात राजकारण असता कामा नये या मताचा माणूस मी असून, सिंधुदुर्गमधील जनतेच्या हितासाठी शासन कोठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.
विश्वजित राणेंच्या भेटीबाबत माहिती होतीगोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितले होते. पण मी विधानसभेत असल्याने गेलो नाही. पण मी सतत गोव्याच्या आरोग्यमंत्र्यांच्या संपर्कात होतो, असे उत्तर मंत्री केसरकर यांनी दिले. माझे विश्वजित राणे यांच्या कुटुंबाशी चांगले संबंध आहेत, असेही ते म्हणाले.