सिंधुदुर्ग : कोकणी मेवा गावठी आठवडा बाजार पावसाळ्यातही : सतीश सावंत यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 04:28 PM2018-04-10T16:28:53+5:302018-04-10T16:28:53+5:30
काही वर्षांपासून हापूस आंबा, पायरी आंबा विक्री वाढत असताना कोकणातील पारंपरिक रायवळ आंबा (आडीतील) मिळणे दुरापास्त झाला होता़, तो रायवळ आंबा आडीत पिकवून गावठी बाजारात विकला जाणार आहे़ ४ मे पासून हंगाम संपेपर्यंत कोकणी मेवा यात जांभूळ, करवंदे, फणसाचे स्टॉल लावण्यात येणार आहेत़.
कणकवली : काही वर्षांपासून हापूस आंबा, पायरी आंबा विक्री वाढत असताना कोकणातील पारंपरिक रायवळ आंबा (आडीतील) मिळणे दुरापास्त झाला होता़ , तो रायवळ आंबा आडीत पिकवून गावठी बाजारात विकला जाणार आहे़ .
४ मे पासून हंगाम संपेपर्यंत जांभूळ, करवंदे, फणस या कोकणी मेवा याचे स्टॉल लावण्यात येणार आहेत़.
आतापर्यंत ११ गावठी आठवडा बाजारांना शेतकऱ्यांचा व ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला़. त्यामुळे पावसातही आठवडा बाजार सुरू ठेवण्यासाठी लोकसहभागातून शेडची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली़.
कणकवली पंचायत समिती सभापती दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते़. यावेळी पंचायत समितीच्या सभापती भाग्यलक्ष्मी साटम, उपसभापती दिलीप तळेकर, खारेपाटणचे जिल्हा परिषद सदस्य बाळा जठार, कणकवली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज भोसले, मंगेश सावंत, स्नेहसिंधु कृषी पदवीधर संघाचे हेमंत सावंत, जिल्हा परिषद बांधकाम अभियंता सुतार आदी उपस्थित होते.
गावठी आठवडा बाजारातून आतापर्यंत १०० हून अधिक शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा भाव शेतमालाला मिळाला आहे़. या गावठी आठवडा बाजाराला नव्याने रायवळ आडीतील आंबा, फणस, करवंदे, जांभूळ यासारखा कोकणी मेवा ४ मे पासून कायमस्वरूपी हंगाम संपेपर्यंत ठेवण्यात येईल़.
त्यादृष्टीने शेतकऱ्यांना माल विकण्यासाठी कट्टे, सावलीसाठी शेडही लोकसहभागातून उभारण्यात येणार आहे़. ज्या-ज्या लोकांकडे जुने वासे किंवा इतर साहित्य असेल तर त्यांनी स्नेहसिंधु पदवीधर संघाशी संपर्क साधावा़ दिलेल्या साहित्याची किंवा रोख रकमेची रितसर पावती स्नेहसिंधू पदवीधर संघ देईल, असे आवाहन सतीश सावंत यांनी केले़.
गावठी आठवडा बाजारासाठी शेड व कट्टे बांधण्यात येणार आहेत़ त्यासाठी आवश्यक असणारे जांभा दगड ९००, वासे १० फुटी ९० नग, ८ फुटी वासे २०० नग, लाकडी रिपा ३५०० फूट, सिमेंट ४० पोती, वाळू १ ट्रीप, खडी १ ट्रीप, १० हजार नळे आदी साहित्य लागणार आहे़. ग्रामीण भागातून हे साहित्य आम्ही घेऊन येणार आहोत़ त्यासाठी हेमंत सावंत, पंकज दळी, बी़ आऱ परब, पंचायत समिती, कणकवली यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन स्नेहसिंधुचे संदीप राणे यांनी केले आहे़.
गावठी आठवडा बाजार पर्यटन केंद्र व्हावे यादृष्टीने प्रयत्न
कणकवली पंचायत समिती, कृषी पदवीधर संघ आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून हा गावठी आठवडा बाजार भरविण्यात येत आहे़. आगामी बदलत्या ऋतुंमध्ये शेतकऱ्यांला आपला माल विकताना अडचण येऊ नये याकरिता लोकसहभागातून शेडची उभारणी करण्यात येणार आहे़.
ही शेडदेखील पारंपरिक साहित्यातून बनविली जाणार आहे़ ही शेड नळे व लाकडी वासे वापरून करण्यात येणार आहे़. हा गावठी आठवडा बाजार पर्यटन अभ्यास केंद्र व्हावे, या दृष्टीने आमचा प्रयत्न असणार आहे, असे सतीश सावंत यांनी सांगितले़