सिंधुदुर्गनगरी : गावाचा विकास करताना सरपंचांनी कॉन्ट्रॅक्टर सरपंच न बनता आदर्श सरपंच बनावे. आपल्याला मिळालेल्या अधिकारांचा योग्य वापर करून गावाचा झपाट्याने विकास करावा, असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी सरपंच-उपसरपंच मार्गदर्शन कार्यशाळेत केले.शरद कृषी भवन येथे शिवसेना पक्षाच्यावतीने आयोजित शिबिराचे उद्घाटन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत, गटनेते नागेंद्र परब उपस्थित होते.खासदार राऊत म्हणाले, शासनाने आता गावाच्या विकासाची संपूर्ण धुरा सरपंचांवर सोपविली आहे. त्यामुळे गावाचा विकास करण्यासाठी सरपंचांना असलेले अधिकार याची त्यांना माहिती मिळावी, हे अधिकार कशाप्रकारे वापरावेत याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी हे मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे. त्यामुळे हे शिबिर लोकप्रतिनिधींना दिशादर्शक असे ठरणार आहे.
ग्रामपंचायतीला आता मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे. हा सर्व निधी खर्च करण्याची सर्वश्री जबाबदारी सरपंच यांचीच आहे. मात्र ही जबाबदारी पार पाडत असताना सरपंचांनी कॉन्ट्रॅक्टर न बनता ह् आदर्श सरपंच बनावे, असे आवाहन राऊत यांनी केले. तसेच ग्रामसेवकांवर अवलंबून न राहता या मार्गदर्शन शिबिरातून अधिकारांची माहिती घेऊन गावाचा विकास करावा.आमदार वैभव नाईक म्हणाले, गावात काम करताना सरपंचांना त्यांचे अधिकार माहीत नसल्याने अनेक अडचणी येतात. त्यामुळे त्यांना काय करावे हे कळत नाही. परिणामी त्यांना ग्रामसेवकांवर अवलंबून रहावे लागते. मात्र या मार्गदर्शन शिबिरात सरपंचांना ग्रामपंचायतविषयक विविध मुद्यांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यांना अधिकारांची माहिती दिली जाणार आहे. या शिबिराचा लाभ घेऊन सरपंचांनी गावात विविध उपक्रम राबवावेत असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी ग्रामपंचायत अॅक्टमधील महत्त्वाच्या तरतुदीतील लेखासंहिता, ग्रामसभा, मासिक सभा, सरपंच, उपसरपंच यांचे अधिकार व कर्तव्ये यावर सुधीर बालम यांनी, आपला गांव आपला विकास, लोकसहभागाचे महत्त्व व त्यातून ग्रामविकास, ग्रामविकासातील प्रेरणास्त्रोत कार्यानुभव या विषयांवर भारत पाटील यांनी तर १४ वा वित्त आयोग व आपला गांव आपला विकास यावर नारायण परब यांनी मार्गदर्शन केले.