सुधीर राणेसिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यातील कुंभवडे हे गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि निसर्गसौंदर्याने नटलेले असे आहे. याठिकाणी असलेल्या टाक्याचा धबधबा व रांजणीचा काप या धबधब्यांपर्यंत जाण्यासाठी पक्के रस्ते आहेत. त्यामुळे कुंभवडेतील हे धबधबे पर्यटकांना वर्षा पर्यटनासाठी निश्चितच आनंददायी ठरणारे आहेत.कुंभवडे गावच्या तीन बाजूंना उंचच उंच पर्वतरांगा आहेत. पावसाळ्यात कडेकपारीतून कोसळणाऱ्या धबधब्यांची रांग, दाट धुके, कोसळणारा पाऊस, हिरवी गर्द वनराई असे विलोभनीय दृश्य पहायला मिळते.
कणकवली शहरातून नरडवे रस्त्याने निघाल्यानंतर कनेडी बाजारपेठेपासून काही अंतरावर गेल्यानंतर मल्हार नदी पुलाच्या अगोदर डाव्या बाजूने जाणारा रस्ता थेट कुंभवडे गावात पोहोचतो. कणकवली ते कुंभवडे हे अंतर सुमारे १८ किलोमीटर आहे. कनेडी बाजारपेठेतून रिक्षा किंवा खासगी वाहनाने कुंभवडेत जाता येते. शिवाय कुंभवडे गावात जाण्यासाठी कणकवली आगारातून एसटीची सोय आहे.देवगड आगारातूनही एक एसटी कुंभवडेपर्यंत सोडण्यात आली आहे. गावात प्रवेश केल्यानंतर रस्त्याच्या एका बाजूला वाहणारी मल्हार नदी, तेथून पुढे गेल्यानंतर श्री देव महालिंगेश्वराचे सुंदर असे मंदिर दिसून येते. पुढे जात असताना सह्याद्रीच्या कुशीत जात असल्याचा भास होतो. तिन्ही बाजूला असलेल्या डोंगरदऱ्यांमधून पावसाळ्यात धबधबे कोसळताना दिसतात. त्यात घोरोडे, पातकुल व त्याच्या बाजूला धबधब्यांचा राजा मुसळा वझर असे धबधबे लक्ष वेधून घेतात.पर्यटकांना चहा, नाश्ता, शाकाहारी, मांसाहारी जेवण, रानभाज्या, पर्यटकांच्या पसंतीनुसार चुलीवरचे जेवण उपलब्ध करून दिले जाणार आहे. यातूनच स्थानिक बेरोजगार तरुणांना काही प्रमाणात रोजगार निर्माण होईल. त्याचबरोबर पर्यटकांसाठी प्रवासी वाहनांची सोय केली जाणार आहे.
त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात जात धबधबे आणि ग्रामजीवनाचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी कुंभवडेतील हे धबधबे निश्चितच सोयीचे ठिकाण आहे. स्थानिक ग्रामस्थ तसेच मुंबईकर मंडळी सध्या या धबधब्यांचा आनंद घेत आहेत.
धबधब्यांना भेट देऊन आनंद लुटानिसर्गाचा आनंद घेताना दाट धुके आणि पावसात ओलेचिंब होत धबधबे अंगावर घेत वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी कुंभवडेतील धबधब्यांना अवश्य भेट द्यावी. एक अविस्मरणीय क्षण अनुभवल्याचे समाधान पर्यटकाना निश्चितच मिळेल, असे कुंभवडे ग्रामविकास संस्था मुंबईचे अध्यक्ष लक्ष्मण बाळकृष्ण सावंत यांनी सांगितले.कुंभवडे येथील निसर्गरम्य वातावरणातील धबधबे पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत.