सिंधुदुर्ग : संदेश पारकरांच्या सत्कारासाठी फडणवीस, ठाकरेंना आणणार : दीपक केसरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 05:30 PM2018-04-05T17:30:12+5:302018-04-05T17:30:12+5:30
संदेश पारकर हे सर्वांना हवेहवेसे वाटणारे उमेदवार आहेत. त्यामुळे संदेश पारकर यांचा विजय निश्चित आहे. त्यांच्या सत्कारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कणकवलीत आणू, असे आश्वासन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.
कणकवली : संदेश पारकर हे सर्वांना हवेहवेसे वाटणारे उमेदवार आहेत. त्यामुळे संदेश पारकर यांचा विजय निश्चित आहे. त्यांच्या सत्कारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कणकवलीत आणू, असे आश्वासन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.
नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर व शिवसेना-भाजप युतीचे नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारासाठी येथील बस स्थानकानजीक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरविकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार विनायक राऊत, संदेश पारकर, भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली, शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, अतुल रावराणे, शिवसेनेचे वैभववाडी-कणकवली विधानसभा मतदारसंघप्रमुख जयेंद्र रावराणे, आमदार वैभव नाईक, राजश्री धुमाळे, महिला आघाडीप्रमुख जान्हवी सावंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, महिला आघाडीप्रमुख स्नेहा तेंडुलकर, शिवसेना-भाजपचे नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार उपस्थित होते.
पालकमंत्री दीपक केसरकर पुढे म्हणाले, सिंधुदुर्गातून वाईट संस्कृती हद्दपार करण्यासाठी सर्वांच्या एकजुटीची गरज असून हे कठीण काम संदेश पारकर निश्चित पूर्ण करतील. संदेश पारकर यांनी कणकवलीची विकासकामे केली असून संदेश पारकर यांच्याबद्दल सर्वांना विश्वास आहे.
नारायण राणे यांनी नगरपंचायतींच्या विकासासाठी ५ वर्षांत फक्त २ कोटी आणले व मी प्रत्येक वर्षाला १५ कोटी आणले हा आमच्या दोघांच्यामध्ये फरक असल्याचे ते म्हणाले. यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, जान्हवी सावंत, राजन तेली यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन आणि आभार प्रमोद जठार यांनी मानले.
विकासासाठी कणकवली दत्तक घेतली : रवींद्र चव्हाण
नगरविकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, कोकणच्या दृष्टीने ही महत्त्वाची निवडणूक असून कणकवलीच्या विकासासाठी शिवसेना-भाजपने कणकवली दत्तक घेतली आहे. सर्वांच्या अडीअडचणी सोडविणारा नेता संदेश पारकर शिवसेना-भाजपकडे असून जनता संदेश पारकर यांच्या पाठीशी आहे.
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार संवेदनशील असून गोरगरीबांच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. २0१४ च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सर्र्वात जास्त नगरसेवक शिवसेना-भाजपचे असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नगरविकास खाते असल्यामुळे शहरांच्या विकासाची जबाबदारी शिवसेना-भाजपने घेतलेली आहे. खऱ्या अर्थाने कणकवलीचा विकास करायचा असेल तर शिवसेना-भाजपला साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले.
भाजपशी २४ तासांत काडीमोड घेतला : विनायक राऊत
संदेश पारकर नगराध्यक्ष होणार यात तिळमात्र शंका नाही. आमदार नीतेश राणे यांनी स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. नारायण राणे खासदार भाजपचे. नगरपंचायतीची निवडणूक लढवतायत भाजपविरोधात. शिवसेनेशी काडीमोड घेतली. काँग्रेसबरोबर जमले नाही. भाजपची खासदारकी मिळवून २४ तासात भाजपाला काडीमोड देऊन भाजपविरोधात निवडणूक लढवणारा गद्दारीचा इतिहास सिंधुदुर्गातच रचला गेला. जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगायला हवी होती, अशा शब्दात खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली.
ते पुढे म्हणाले, नारायण राणे यांनी फक्त स्वत:चा विकास केला. सिंधुदुर्गसाठी काहीही केलेले नाही. कणकवलीची सत्ता सुसंस्कृत संदेश पारकर यांच्याकडे द्यावी, असे आवाहन त्यानी केले.
कणकवलीकर मला निश्चितच साथ देतील : संदेश पारकर
नारायण राणे यांचा करिष्मा संपला असून ते कुठल्याच निवडणुकीत विजयी होऊ शकत नाहीत. कणकवलीच्या जनतेची मागणी होती म्हणून नगराध्यक्षपदाचा अर्ज भरला. भाजपच्या नेत्यांची मागणी होती म्हणून मी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहे.
माझा कणकवलीकरांवर पूर्ण विश्वास असून ते मला नक्कीच साथ देतील, असा विश्वास शिवसेना-भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी व्यक्त केला. शहराचा कायापालट करायचा असेल तर शिवसेना-भाजपला साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले.