सिंधुदुर्गनगरी : मच्छिमारांना पोलिसांकडून त्रास होऊ नये यासाठी आपण जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेत त्यांचे मच्छिमारांवरील अन्यायाबाबत लक्ष वेधले असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी दिली.गोव्यातील मासेमारी करणाऱ्या बोटी सिंधुदुर्गात येऊन बेकायदेशीर मासेमारी करतात व या किनारपट्टीवरील मासे लुटून नेतात. त्यामुळे मालवणच्या मच्छिमारांनी गोव्यातील त्या बेकायदेशीर बोटी पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्याची भूमिका घेतली. मात्र. त्या बोटींवर कोणत्याही प्रकारचा दरोडा घातला नव्हता, त्यामुळे पोलिसांची कारवाई चुकीची आहे. यापुढे
मालवण समुद्रात गोव्यातील मच्छिमार बोटी अनधिकृतरित्या येऊन प्रकाशझोतातील मासेमारी करतात. यामुळे येथील मच्छिमारांचे मोठे नुकसान होते. या बोटी मालवण येथील मच्छिमारांनी ताब्यात घेत त्या पोलिसांच्या ताब्यात दिल्या. यानंतर मालवणच्या या मच्छिमारांवर पोलिसांनी दरोड्याचे गुन्हे दाखल करून त्यांची धरपकड सुरु केली आहे. हा विषय गंभीर बनला आहे.या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांची भेट घेतली. यावेळी स्वाभिमान पक्षाचे जिल्हाधक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई, अशोक सावंत, सुरेश सावंत, संदीप कुडतरकर, एकनाथ नाडकर्णी, मिलिंद मेस्त्री आदींसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.पालकमंत्र्यांना लगावला टोलापोलीस अधीक्षकांना भेटून आल्यावर पत्रकारांशी बोलताना नारायण राणे म्हणाले की, मालवणच्या मच्छिमारांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. आणि गोव्याहून सिंधुदुर्गमध्ये येऊन मासेमारी करणे हे चुकीचे आहे. आणि तेही प्रकाश झोतात.
बाहेरून येणारे मच्छिमार येथील मासे घेऊन जातात आणि येथील मच्छिमारांवर उपासमारीची पाळी येते. त्यामुळे अशा बेकायदेशीररित्या मच्छिमारी करणाऱ्या बोटींविरोधात आंदोलन करत या बोटी पकडून पोलिसांकडे दिल्या. हा काही त्यांचा गुन्हा नाही! असे असतानाही या मच्छिमारांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
ही चुकीची पद्धत आहे. खरे म्हणजे गस्तीनौकांच्या माध्यमातून अशा या नौका सरकारने पकडणे आवश्यक आहे. मात्र हे होताना दिसत नाही. असे सांगतानाच आपण पालकमंत्री असताना चार चार गस्तीनौका होत्या, असा टोलाही राणे यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांना लगावला.