वैभववाडी : राज्य सरकार कोकणाकडे विकासाच्या दृष्टीकोनातून पहात असल्यामुळेच अर्थसंकल्पात उद्योग, पर्यटन, बंदरविकास, किल्ले संवर्धन व शेतीसाठी भरीव तरतूद केली आहे. त्यातून भाजपच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती मिळून कोकणातील पुढची पिढी समृद्ध झालेली पहायला मिळेल, असा आशावाद भाजप नेते अतुल रावराणे यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात रावराणे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सज्जन रावराणे, बंडू मुंडल्ये, सभापती लक्ष्मण रावराणे, कणकवली तालुकाध्यक्ष संदेश सावंत, सुनील नारकर, धुळाजी काळे उपस्थित होते.रावराणे पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग किल्ला आणि पर्यटन ही जिल्ह्याची खरी ओळख आहे. त्यामुळे किल्ल्याच्या रुपाने ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी १० कोटी, इको-टुरिझमसाठी १२० कोटी, खारबंधाऱ्यांसाठी ६० कोटी, कार्यालयात उद्योगासाठी १० कोटी रुपये तसेच गोरगरीब रुग्णांसाठी ६० कोटींच्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाला २० कोटी रुपये अशी भरीव तरतूद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. त्यामध्ये संपर्कमंत्री रवींद्र चव्हाण यांचेही मोठे योगदान आहे.
पंतप्रधानांनी कोकणचे सुपुत्र केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे हवाई उड्डाण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपविल्यामुळे चिपी विमानतळाचे लांबलेले काम नजीकच्या काळात पूर्णत्वास जाऊन जिल्ह्यात लवकरच विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग खुला झाला आहे.ते पुढे म्हणाले की, कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी नाणारचा रिफायनरी प्रकल्प, बंदरजेटी, महामार्ग चौपदरीकरण हे भाजपने महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणले आहेत. ते निश्चितपणे पूर्णत्वास जातील. त्यातून कोकणातील पुढची पिढी समृद्ध झालेली पहायला मिळेल. त्यामुळे एनडीएची ध्येयधोरणे, आणि भाजपचा विकासाचा दृष्टीकोन मित्रपक्षांनी समजून घेऊन विकासाला सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन शिवसेना आणि स्वाभिमान पक्षाला उद्देशून रावराणे यांनी केले.अखेर स्वाभिमानचे रोंबाट इच्छितस्थळी पोचलेकाँग्रेसमध्ये असताना गेल्यावर्षीच्या शिमग्यात नारायण राणे यांनी सुरू केलेले रोंबाट अखेर वर्षभराने इच्छितस्थळी पोचले आहे. कोकणच्या हितासाठी राणेंनी शिवसेना सोडली. कोकण विकासासाठी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन स्वाभिमान पक्ष स्थापन करून एनडीएत सामील होत राज्यसभेची आॅफर स्वीकारली. तेथे त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग होईल. त्यांनी राज्यसभेत राहून महाराष्ट्राला मार्गदर्शन करावे, आम्ही ते घेऊ, अशी कोपरखळी रावराणे यांनी मारली.शिवसेना आणि स्वाभिमान पक्ष हे दोन्ही एनडीएचे मित्रपक्ष आहेत. त्यामुळे कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजप कोणासोबत युती करणार? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता, शिवसेना आणि स्वाभिमान पक्षाने स्वबळावर लढण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे भाजपही स्वबळावर लढण्यासाठी सज्ज आहे. भाजपचे संपर्कमंत्री १५ रोजी जिल्ह्याच्या कोअर कमिटीसोबत चर्चा करुन अंतिम निर्णय घेतील. ते घेतील तो निर्णय आम्हांला मान्य असेल, असे अतुल रावराणे यांनी स्पष्ट केले.