कणकवली : नीतेश राणे हे माझ्यामुळे आमदार झाले. पुढील निवडणुकीत ते आमदार म्हणून दिसणार नाहीत. वाल्याचा वाल्मिकी करायला गेलो पण सुधारणा काहीच झाली नाही, असा आरोप शिवसेना-भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी केला.
खंडणीबहाद्दर नीतेश राणे यांच्या सर्टीफिकेटची आम्हांला गरज नाही. कणकवलीतील जनता सुज्ञ असून ती शिवसेना-भाजपला नक्कीच विजयी करील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. येथील वैभव भवन येथे शिवसेना-भाजपच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक उपस्थित होते.संदेश पारकर पुढे म्हणाले, नगरपंचायतीत काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे फोटो लावण्यात आलेले होते. ते आपण उतरविले व त्या ठिकाणी परमपूज्य भालचंद्र महाराज व अप्पासाहेब पटवर्धन यांचे फोटो लावले. अशा गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांना कणकवलीतील जनता मत देणार नाही, असा विश्वासही पारकर यांनी व्यक्त केला.स्वाभिमानच्या आयात उमेदवारांना कुठलाही मतदार मत देणार नाही. कणकवलीतील जनता ६ एप्रिलला आपले मत मतपेटीत बंद करेल. मात्र हे मत शिवसेना-भाजपच्या बाजूने निश्चित असेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. आज राणे कुटुंब कुठल्या पक्षात आहे हेच माहीत नाही. त्यांनी स्वत:चा राजकीय इतिहास ओळखावा.
पैशाच्या आमिषाला कणकवलीतील जनता भीक घालणार नाही. मी माझी मते दिली म्हणून नीतेश राणे आमदार झाले. आता ते पुढील निवडणुकीत आमदार म्हणून दिसणारही नाहीत. त्यांनी आमदारकीची स्वप्ने पाहू नयेत, असे संदेश पारकर यांनी सांगितले.पारकर पुढे म्हणाले, माझ्याकडे बघून मते द्या, असे आवाहन नारायण राणे करीत आहेत. आपल्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाºयांना वेळेवर पगार मिळतो का ते राणे कुटुंबीयांनी पहावे. कणकवलीतील मूळ प्रश्नाकडे स्वाभिमानने लक्ष दिलेला नाही. गेली ५ वर्षे राणे कणकवलीचा विकास का करू शकले नाहीत. राणे यांनी मागे वळून आपला इतिहास पहावा. अशा प्रवृत्तीच्या लोकांकडे कणकवलीतील जनता ढुंकूनही पाहणार नाही, असे संदेश पारकर म्हणाले.स्वाभिमानकडे उमेदवारसुद्धा नाहीत. एकाच घरात दोन दोन उमेदवार दिले आहेत. कणकवलीकरांना गुंडगिरी नको आहे. श्रीधर नाईक हत्या कोणी केली हे कणकवलीकरांना माहीत आहे. गाड्या कुणी जाळल्या हे सुद्धा कणकवलीवासीयांना माहीत आहे. त्यामुळे कणकवलीतील सुज्ञ जनता आता फसणार नाही.कणकवलीवासीय शिवसेना-भाजपवरच विश्वास ठेवतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. राणे कुटुंबीयांबद्दल संदेश पारकर यांनी संताप व्यक्त केला. यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, नीतेश राणे यांच्यावर कणकवलीतील जनतेचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे जनता त्यांना स्वीकारणार नाही. या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांनाच जनता निवडून देईल, असा आशावाद व्यक्त केला.
उमेदवार आयात करण्याची वेळ!आमदार नीतेश राणे यांनी ज्या योजना आणल्या त्या सर्व योजना बंद पडल्या. एकही योजना चालू राहिली नाही. त्यामुळे जनतेचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. कणकवलीतील आरक्षणे शिवसेना-भाजप विकसित करेल.स्वाभिमान पक्षाला उमेदवारच मिळत नव्हते. त्यांना उमेदवार आयात करावे लागले. ज्या जनतेचा नीतेश राणे यांच्यावरील विश्वास उडाला आहे त्या पक्षाला जनता कशाला मत देईल, असा सवालही वैभव नाईक यांनी केला. शिवसेना-भाजपचा कणकवलीत विजय निश्चित आहे, असा असा विश्वासही वैभव नाईक यांनी व्यक्त केला.