सिंधुदुर्ग : शालार्थ प्रणालीतील गोंधळ कायम, मार्चपर्यंत शिक्षकांचे ऑफलाईन वेतन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 02:50 PM2018-08-03T14:50:03+5:302018-08-03T14:55:15+5:30
शालार्थ प्रणालीतील गोंधळ अद्यापी दूर न झाल्यामुळे, राज्यातील शिक्षकांचे वेतन मार्च 2019 पर्यंत ऑफलाईन काढावे, अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार अॅड. निरंजन वसंत डावखरे यांनी केली आहे. आमदार डावखरे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना निवेदन दिले. याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन तावडे यांनी दिले आहे.
सिंधुदुर्ग : शालार्थ प्रणालीतील गोंधळ अद्यापी दूर न झाल्यामुळे, राज्यातील शिक्षकांचे वेतन मार्च 2019 पर्यंत ऑफलाईन काढावे, अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार अॅड. निरंजन वसंत डावखरे यांनी केली आहे. आमदार डावखरे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना निवेदन दिले. याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन तावडे यांनी दिले आहे.
शिक्षकांचे वेतन होणाऱ्या शालार्थ प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे राज्य सरकारने जुलै 2018 पर्यंत ऑफलाईन पगाराला परवानगी दिली होती. मात्र, शालार्थ प्रणालीतील बिघाड अद्यापी कायम आहे. त्यामुळे शिक्षकांच्या ऑगस्टच्या पगाराबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
शाळांच्या मुख्याध्यापकांकडून दरमहा 10 तारखेपर्यंत पगाराची बिले सादर केली जातात. मात्र, या संदर्भात राज्य सरकारचे कोणतेही आदेश नसल्यामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे ऑगस्टचा पगार उशीरा होण्याची भीती होती.
या पार्श्वभूमीवर आमदार निरंजन डावखरे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची आज भेट घेतली. तसेच त्यांना मार्च 2019 पर्यंत शिक्षकांचे ऑफलाईन वेतन काढण्याची मागणी केली. यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्याचे शिक्षणमंत्र्यांनी आश्वासन दिले.
शालार्थ प्रणालीमधील बिघाड केव्हा दुरुस्त होईल, अशी विचारणा आमदार डावखरे यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना केली होती. त्यावेळी किमान आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर शाळांची माहिती अपलोड करण्यासाठी जादा कालावधी लागू शकेल. त्यामुळे शैक्षणिक वर्ष पूर्ण होईपर्यंत म्हणजे मार्चपर्यंत ऑफलाईन वेतनाची पद्धत सुरू ठेवावी, अशी मागणी आमदार डावखरे यांनी केली.