सिंधुदुर्ग : सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेली मालवण तालुक्यातील आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वराची ऐतिहासिक डाळपस्वारी सुरू झाली आहे.आचरे संस्थानचा राजा असलेला श्री देव रामेश्वर रयतेची सुखदु:खे जाणून घेण्यासाठी भक्तांच्या दारी जात आहे. डाळपस्वारीच्या माध्यमातून श्री देव रामेश्वर रयतेच्या संपूर्ण रक्षणाची हमी देत आहे.श्रींच्या स्वागतासाठी संपूर्ण आचरे गाव नववधूसारखा नटला आहे. शासनाच्या ग्रामस्वच्छता अभियानालाही लाजवेल एवढी स्वच्छता व सौंदर्य या डाळपस्वारीनिमित्त येथे अनुभवता येत आहे.
श्रींची स्वारी गाऊडवाडी येथील ब्राम्हणदेव मंदिरातून रवाना झाली. गाऊडवाडी येथील लोकांची गाणी आणि ओट्या स्वीकारत डाळपस्वारी दुपारी बोटीतून जामडुल बेटाकडे रवाना झाली.जामडुलच्या जनतेची गाऱ्हाणी ऐकण्याअगोदर जामडुल खाडीपात्राच्या पलीकडे असलेल्या पिरावाडी येथील हजरत पीर इब्राहिम खलील या पिराला भेट देत आदरपूर्वक मान राखून याठिकाणी समस्त रयतेची गाऱ्हाणी ऐकली. जामडुलवासीयांनी श्रींच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. या ठिकाणी विश्रांती घेतल्यानंतर श्रींची स्वारी होडीतून जलविहार करत जामडुल बेटावर रवाना झाली.