कणकवली : वैभववाडी येथील सभेत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर तसेच भाजपवर टिका केली आहे. परदेशातील काळा पैसा परत आणून प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर 15 लाख रूपये जमा करणार असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. त्याचे काय झाले? असा प्रश्न त्यानी या सभेत उपस्थित केला. हा प्रश्न दिल्ली येथील खासदारांच्या बैठकीत राणे यांनी नरेंद्र मोदींना विचारण्याचे धारिष्ट्य दाखवावे असा प्रती टोला शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे.कणकवली येथील विजय भवन मध्ये बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले, विधिमंडळात मी काय बोलतो ? याबाबत नारायण राणे यांनी बोलण्यापेक्षा तसेच सभेत शासनाच्या धोरणांबाबत टिका करण्यापेक्षा प्रत्यक्ष पंतप्रधानापुढे खासदारांच्या बैठकीत बोलावे. त्याना प्रश्न विचारावे.सत्तेसाठी शिवसेना लाचार असल्याचे ते सांगत आहेत. मात्र, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा सत्तेसाठी लाचार झालेल्या लोकानीच स्थापन केलेला आहे. हे जनतेला माहिती आहे. एका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तटकरेना तर दुसऱ्या निवडणुकीत भाजपच्या निरंजन डावखरेना पाठिंबा देणाऱ्यांचा उद्देश काय असू शकतो हे जनता ओळखून आहे.
आता ते आपला पक्ष वाढविण्याची स्वप्ने पहात आहेत. परन्तु त्यांच्या सोबत असलेले शेवटचे आमदार कालिदास कोळंबकर भाजप मध्ये गेले आहेत. याउलट शिवसेना आता पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली देशातील विविध ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित करीत आहे.आमच्यावर टक्केवारीचा आरोप त्यांनी केला आहे. परंतु महामार्ग चौपदरीकरणाचे काम प्रथम थांबविले आणि त्यानंतर सुरु करायला दिले. यामागचे नेमके गौड़ बंगाल काय? याबाबत सध्या जिल्ह्यात चर्चा सूरू आहे. त्याचा प्रथम त्यांनी कानोसा घ्यावा.सर्वत्र स्वाभिमानची लाट आहे असे सांगितले जात आहे. तसे असेल तर आमदार नीतेश राणे यांनी सर्व प्रथम राजीनामा द्यावा. आणि निवडणुकीला उभे रहावे. म्हणजे त्याना कोणाची लाट आहे ते नेमके दिसेल. जनतेने त्याना आता पूर्ण ओळखले असल्याने सत्तेची स्वप्ने पहाणे त्यांनी सोडून द्यावे.सध्या शासनाने घेतलेल्या नवीन निर्णया मुळे विकास कामे स्पर्धेवर सुरु आहेत. त्यामुळे ठेकेदारांशी मिलीभगत करता येत नाही. याच मुळे राणेंच्या लोकांना तोटा होत आहे. तर हेच कारण विकास कामांवर त्यांनी टिका करण्यामागे असल्याचे वैभव नाईक यावेळी म्हणाले.शिवसेनेला फरक पड़त नाही!जयेंद्र रावराणे यांचा जास्तीत जास्त वेळ बुवा बाजीत जायचा . त्यामुळे त्यांना पक्ष तसेच समाज सेवा करायला वेळ मिळत नव्हता . याचसाठी आम्ही त्याना पक्षापासून लांब ठेवले होते. त्यांच्या पक्ष बदलण्यामुळे वैभववाडीत शिवसेनेला फरक पड़त नाही. असे एका प्रश्नाचे उत्तर देताना वैभव नाईक यांनी सांगितले.