खारेपाटण : प्रत्येक माणूस आपल्या स्वकर्तृत्वाने मोठा होत असतो. परंतु छोट्याशा गावात विंदांसारखा मोठा माणूस जन्म घेतो आणि त्याच खेडेगावातील ग्रामस्थ छोटेसे वाचनालय सुरू करुन ५०० पुस्तकांचा संग्रह वाचनालयात ठेऊन चांगली वाचनसंस्कृती जोपासण्याचे कार्य करीत आहेत. आणि हेच कार्य तुम्हां आम्हां सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे भावपूर्ण उद्गार प्रसिद्ध समीक्षक, कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांनी विंदा करंदीकर स्मृती ग्रामविकास वाचनालय कोर्ले नामकरण कार्यक्रमात काढले.विंदा करंदीकर यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमाचे औचित्य साधून विंदांच्या मूळ गावी कोर्ले येथील ग्रामविकास वाचनालय कोर्ले या वाचनालयाचे नामकरण विंदा करंदीकर स्मृती ग्रामविकास वाचनालय कोर्ले असे करण्यात आले.या कार्यक्रमाला विंदांच्या कन्या जयश्री काळे, विंदांचे जावई विश्वास काळे, विंदांचे सुपुत्र आनंद करंदीकर, राज्य मराठी विकास संस्थेचे प्रभारी संचालक आनंद काटीकर, दिग्दर्शक गिरीश पतके, वर्षा गजेंद्र गडकरी, वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानचे प्रमुख वामन पंडित, नवव्या अखिल भारतीय गझल साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मधुसूदन नानिवडेकर, कोर्ले सरपंच विश्वनाथ खानविलकर, पोंभुर्ले सरपंच सादीक डोंगरकर, प्रसाद घाणेकर, प्रा. अनिल फराकटे, अॅड. प्रसाद करंदीकर, संतोष रानडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आज मला फार आनंद होत आहे, की आपल्या माहेरी माझे अशा पद्धतीने स्वागत करण्यात आले. त्यामुळे मी भारावून गेले असून विंदा हे लहान मुलांना प्रेरणा देणारे आहेत. अनेक पुस्तकांचे ज्ञानभांडार येथील वाचनालयात असल्यामुळे या गावचा ग्रामविकास आपोआप होणार आहे.
कोकणच्या मातीचा गुण असा आहे की, या मातीतील माणूस फार मोठा होतो. वयाच्या सातव्या वर्षी कविता लिहून विंदा शिक्षणासाठी बाहेर पडले व त्यांनी सर्व विषयात प्रगल्भ ज्ञान प्राप्त केले. त्यामुळे इथल्या मातीच्या गुणधर्मामुळे तुम्ही निश्चितच मोठे व्हाल, असे उद्गार डॉ. अरुणा ढेरे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना काढले.विश्वास काळे यांनी विंदांच्या बालकविता या पुस्तकांचा संच विंदा करंदीकर स्मृती ग्रामविकास वाचनालयाला भेट देऊन लहान मुलांना वाचन करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक वाचनालयाचे कार्यवाह वासुदेव गोवळकर यांनी केले. सूत्रसंचालन नितीन करंदीकर यांनी केले.साहित्यिकांनी दिली विंदांच्या मूळ गावी भेटविंदा करंदीकर यांच्या स्मृतिदिनी त्यांचा मुलगा आनंद करंदीकर, मुलगी जयश्री काळे, जावई विश्वास काळे, डॉ. अरुणाताई ढेरे, व अन्य साहित्यिकांनी कोर्ले धालवली येथील त्यांच्या मूळ गावी भेट दिली. यावेळी त्यांनी विंदांचे मूळघर, विंदा शिकलेली प्राथमिक शाळा, ब्रह्मदेव मंदिर आदी ठिकाणी भेटी दिल्या.