मालवण : येथील सिंधुदुर्ग किल्ल्यानजीकच्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेली एक मासेमारीची पात (छोटी नौका) बुडाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या पातीवरील चारही मच्छिमारांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले. मात्र, सध्या मासेमारी बंदी कालावधी सुरू असतानाही मासेमारी सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. याकडे मत्स्य व्यवसाय विभागाचे दुर्लक्ष असल्याचेही दिसून आले आहे.पावसाळी कालावधीत मासेमारी बंदी असते. येत्या १ आॅगस्टपासून मासेमारी हंगामास सुरुवात होणार आहे. मात्र पावसाळी कालावधीतही काही मच्छिमारांकडून मासेमारी सुरू असल्याचे मंगळवारी घडलेल्या घटनेवरून सिद्ध झाले आहे. येथील किल्ल्यानजीकच्या समुद्रात मंगळवारी सकाळी चार मच्छिमार एक पात घेऊन मासेमारीस गेले होते.
यावेळी समुद्री उधाण व वाऱ्याचा जोर असल्याने ही पात समुद्रात बुडाली आणि चारही जण समुद्रात फेकले गेले. या चारही जणांनी नजीकच असलेला पद्मगड किल्ला पोहत गाठला. या घटनेची माहिती मिळाल्यावर काही स्थानिक मच्छिमारांनी दुसऱ्या नौकेच्या सहाय्याने त्यांना सुखरूप किनाºयावर आणले.सध्या मासेमारी बंदी कालावधी असताना मच्छिमारांची पात बुडाल्याची घटना समोर आल्याने मत्स्य व्यवसाय विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. या घटनेची माहिती कोणाला मिळू नये यासाठी कमालीची गुप्तता पाळण्यात येत होती.
या घटनेसंदर्भात सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त महाडिक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशी घटना घडली असल्यास त्याची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश परवाना अधिकारी खाडे यांना दिले.