सिंधुुदुर्ग : समाजकल्याणच्या कामांचे ठेकेदार तुम्ही तुमच्या फायद्यासाठी स्वत:च्या मर्जीतील नेमायचे आणि कामे आम्ही पूर्ण करायची ही कुठली पद्धत? असा सवाल उपस्थित करीत सभापती गणपत नाईक यांनी माझी ही जबाबदारी नाही, असे सांगत माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांच्यावर गंभीर आरोप केल्याने दोडामार्ग तालुक्याची तालुकास्तरीय तक्रार निवारण व आढावा बैठक चांगलीच गाजली. अखेर जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी ठेकेदार नेमण्याचा अधिकार लोकप्रतिनिधींना नसल्याचे सांगून या वादावर पडदा टाकला.सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून दोडामार्ग तालुकास्तरीय तक्रार निवारण आढावा बैठकीचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर, संपदा देसाई, पंचायत समिती सभापती गणपत नाईक, उपसभापती सुनंदा धर्णे, पंचायत समिती सदस्य लक्ष्मण नाईक, धनश्री गवस आदी उपस्थित होते.या बैठकीत तालुक्यातील सरपंचांनी आपल्या ग्रामपंचायतीतील अपूर्ण असलेल्या कामांबाबत सभागृहात विभागवार माहिती देऊन आढावा घेतला. समाजकल्याण विभागाचा सभागृहात आढावा घेतला असता तालुक्यात समाजकल्याण अंतर्गत सुरू असलेली कामे अपूर्णावस्थेत असल्याचे पुढे आले. यावेळी जिल्हा परिषदेचे शाखा अभियंता एन. एस. पवार यांनी अपूर्ण असलेल्या कामांची माहिती दिली.यावर माजी सभापती अंकुश जाधव यांनी पवार सहकार्य करीत नसल्याने कामे अपूर्ण राहिली, असा आरोप केला. यावर पवार यांनी, जाधव यांनी सांगितलेलेच ठेकेदार आहेत. त्यामुळे कामे पूर्ण व्हायलाच हवी होती, असे उत्तर दिल्याने सभागृहात हशा पिकला.
आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या तालुक्यासाठी कामे सुचवितो आणि जास्तीत जास्त निधी आणतो. त्यामुळे पुढे ती पूर्ण करून घ्यायची जबाबदारी अधिकारी आणि पंचायत समिती सभापतींची असते, असे जाधव यांनी सांगितल्याने सभापती गणपत नाईक व अंकुश जाधव यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक झाली.
तुम्ही तुमच्या फायद्यासाठी हवे ते ठेकेदार नेमता आणि कामे पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्यावर ढकलता, असाआरोप सभापतींनी जाधव यांच्यावर केला. त्यामुळे चांगलीच खडाजंगी झाली. अखेर जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी ठेकेदार लोकप्रतिनिधी नेमत नाहीत किंवा त्यांना तसा अधिकार नाही, असे सांगून दोघांनाही गप्प केल्याने या वादावर पडदा पडला.