तळवडे (सिंधुदुर्ग ) : शेर कधी घायाळ होत नाही, तो दुसऱ्याला घायाळ करतो. विकास करण्यासाठी राजकीय वजन, रूबाब आणि अभ्यास लागतो. कोकणात अनेक नेते होऊन गेले, तरीही कोकण मागे का राहिले? याचा विचार करणे गरजेचे आहे. सत्तेत नसूनही माझे राजकीय वजन कायम आहे. कारण मी सर्वसामान्यांसाठी झटणारा नेता आहे, असे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी होडावडे येथे म्हणाले.
होडावडे ग्रामोन्नती मंडळ, मुंबईच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित होडावडा महोत्सव २०१७ चे उद्घाटन नारायण राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी होडावडे ग्रामोन्नती मंडळाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.
जिल्ह्यात अनेक मंडळे उदयास येतात. मंडळ काढल्यानंतर त्याचे अस्तित्व टिकविणे गरजेचे आहे. क्रियाशील, प्रामाणिक कार्यकर्त्यांमुळेच मंडळे कायम टिकतात. मंडळांनी रोजगार निर्मितीकरिता प्रयत्न करावेत. मुंंबईकर चाकरमान्यांनी स्थापन केलेली मंडळे, संस्थांचा उपयोग गावच्या विकासासाठी करावा. तरच त्यांचा उद्देश साध्य होईल, असे मत नारायण राणे यांनी येथे व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर मंडळाचे कार्याध्यक्ष बी. एम. राऊळ, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, मंडळाचे सचिव विठ्ठल मेस्त्री, उपाध्यक्ष संभाजी होडावडेकर, स्वाभिमान पक्षाचे संदीप कुडतरकर, तालुकाध्यक्ष मनीष दळवी, खजिनदार उल्हास केरकर, पंचायत समिती सदस्य पंकज पेडणेकर, ऋषिकेश धावडे, विनायक धावडे, मनोहर नाईक आदी उपस्थित होते.यावेळी राणे यांनी जिल्ह्याच्या व राज्याच्या विकासात्मक घडामोडींवर भाषण केले. मीही सर्वसामान्य गिरणी कामगार घराण्यातला आहे. त्यामुळे गरिबांच्या हालअपेष्टा माहीत आहेत. सर्वसामान्य जनतेसाठी मी प्रयत्न करणार आहे. मला मंत्रिपदाची आशा मुळीच नाही. कोकणी जनतेचा विकास करणे हे माझे ध्येय आहे. पण आज जनतेला विकास करणारे लोकप्रतिनिधी नकोत, फक्त आश्वासने देणारे मंत्री पाहिजेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.मी कोकणात १९९० साली आलो. युती सरकारच्या काळात आमदार झालो. जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेतला आणि जोमाने काम केले. सिंधुदुर्ग हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून निर्माण केला. त्याची यशस्विता आपल्याला पहायला मिळत आहे. जिल्ह्यात पाण्याची उणीव भासू नये यासाठी २३० कोटींचा निधी मंजूर करून आणला. मुख्यमंत्री झाल्यानंतर जिल्ह्याचा विकास हाच माझ्या कामाचा केंद्रबिंदू होता, असे ते म्हणाले.यावेळी आयोजित रक्तदान आणि आरोग्य शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. मुंबई येथील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा नारायण राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ. जुवेकर, डॉ. स्मिता केरकर, डॉ. भिवा नाईक, डॉ. गणपत टोपले, समीर सावंत यांचा समावेश होता.
पोलिसांकडून पर्यटकांना त्रासआज कोकणात येणाऱ्या पर्यटकांची ठिकठिकाणी पोलिसांकडून तपासणी केली जाते. पर्यटकांना नाहक त्रास दिल्यास जिल्ह्यात पर्यटक कसे येतील? जिल्ह्यातील पर्यटन कसे वाढेल? असे प्रश्न उपस्थित करून राणे यांनी नाराजी व्यक्त केली. विरोधकांनी जिल्ह्याचा विकास किती केला ते दाखवून द्या, असे आव्हानही त्यांनी केले.