दोडामार्ग : दोडामार्ग नगरपंचायतीमार्फत येथील बाजारपेठेत आयोजित केलेल्या एका रस्त्याच्या मोजणीदरम्यान मुख्याधिकारीच अनुपस्थित राहिल्याने संतप्त नागरिकांनी मोजणी रोखली व फेरमोजणीची मागणी केली. नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी नागरिकांच्या मागणीचा विचार करून पुनर्मोजणी करण्याच्या सूचना नगरपंचायत प्रशासनाला केल्या.दोडामार्ग बाजारपेठेतील जनता बाजार रोड या अंतर्गत रस्त्याच्या मोजणी तथा हद्द कायम मोजणी करण्याचे नगरपंचायत प्रशासनाने ठरविले होते. त्यानुसार या रस्त्यालगतच्या कब्जेदारांना भूमी अभिलेख कार्यालयामार्फत मोजणीवेळी हजर राहण्यासंदर्भात पंधरा दिवसांपूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.
मात्र, काही कब्जेदारांना नोटिसा काढल्या नव्हत्या. या पार्श्वभूमीवर गुरूवारी सकाळी मोजणी प्रक्रियेला सुरूवात झाली असता उपस्थित नागरिकांनी मोजणीला जोरदार हरकत घेतली.
रस्त्यालगतच्या अनेक कब्जेदारांसोबत सुरेश ऐनापूरकर, अशोक भिसे, गावडे, मिरकर आदींना हद्द कायम मोजणीच्या नोटिसा का काढल्या नाहीत, मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी आयोजित केलेल्या या मोजणीला ते स्वत: गैरहजर का, असे सवाल नागरिकांनी नगरपंचायतीचे कर्मचारी संजय तिरोडकर, मठकर आदींना केले.
मुख्याधिकाऱ्यांनी आपल्या गैरहजेरीत या मोजणीचा चार्ज कुणाकडे दिला, मोजणीसंदर्भात आमच्या सूचना, मागण्यांची दाद कुणाकडे मागायची आदी प्रश्नांचा भडिमार नागरिकांनी केला. ज्यांनी मोजणी आयोजित केली, त्यांच्या अनुपस्थितीत मोजणी होऊ देणार नाही, असा पवित्रा घेत नागरिकांनी मोजणी रोखली.या दरम्यान तेथे दाखल झालेल्या नगराध्यक्ष संतोष नानचे यांनीही नागरिकांच्या सूचना व मागण्यांचा विचार करा, सर्वांना विश्वासात घेऊन फेरमोजणी करा, अशा सूचना कर्मचाऱ्याना केल्या. भूमीअभिलेख कार्यालयातील भूकरमापक पांडुरंग राणे यांनीही मोजणी स्थगित करीत असल्याचे स्पष्ट केले.यावेळी नगरसेवक राजेश प्रसादी, व्यापारी संघाचे अध्यक्ष लवू मिरकर, सुरेश ऐनापूरकर, अनिल सांबाटी, आनंद कामत, दिलीप राणे, विजय हेरेकर, विशाल मणेरीकर, संदीप मिरकर, सतीश मिरकर, अशोक शिरोडकर, बसप्पा हेरेकर आदी उपस्थित होते.नागरिकांची मागणी रास्त!आजच्या जमीन मोजणी प्रक्रियेची नोटीस प्रक्रिया अर्धवट असल्याचे दर्शवित भूमीअभिलेख कार्यालयातील भूकरमापक पांडुरंग राणे यांनी वृत्तपत्रातील नगरपंचायतीची जाहीर नोटीसही कायद्याला धरून नसून ती अधिकृत ग्राह्य धरता येत नसल्याबाबत लक्ष वेधत नोटीस बजावणी प्रक्रियेबाबत नागरिकांची मागणी रास्त असल्याचे स्पष्ट केले.