सिंधुदुर्गनगरी : कोणताही वाळू उत्खनन परवाना नसताना कालावल खाडीत राजरोसपणे वाळू उत्खनन केले जात आहे. परिणामी खोतजुवा बेटाची हानी होत आहे. वाळू उत्खननातून भविष्यात या बेटाला धोका उद्भवू शकतो. त्यामुळे हे अनधिकृत वाळू उत्खनन थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मालवण तालुक्यातील खोतजुवा ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांना दिला आहे.खोतजुवा हे एक बेट आहे आणि या बेटावर बेकायदा व राजरोसपणे वाळू उत्खनन सुरू आहे. त्यामुळे या बेटाला धोका निर्माण झाला आहे. येथील लोकांचे बाजारहाट तसेच मुलांना शाळेत येणे-जाणे कालावल खाडीतून होत असल्याने त्यांच्या प्रवासात अडचणी निर्माण होत आहेत.
वाळू वाहतुकीमुळेही रस्त्याची दुर्दशा झाली आहे. होडीवर काम करणारे परप्रांतीय उघड्यावर नैसर्गिक विधी करीत असल्याने दुर्गंधी पसरत आहे.याबाबत मालवण तहसीलदारांचे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र, अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही. याबाबत आपल्या स्तरावरून योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडणार असल्याचे या ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर साईप्रसाद खोत, पराग खोत, रणजित खोत, चिंतामणी खोत, नंददीपक खोत, अनिल खोत यांच्यासह एकवीस ग्रामस्थांच्या सह्या आहेत.