सिंधुदुर्ग : पोलिसांकडून ताडपत्री गँगचा पर्दाफाश, गुजरातमधील दोघांच्या मुसक्या आवळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 02:29 PM2018-05-03T14:29:29+5:302018-05-03T14:29:29+5:30
मुंबई-गोवा महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकमधून साहित्य चोरणाऱ्या टोळीचा जिल्हा पोलीस दलाने पर्दाफाश केला आहे. ताडपत्री गँग म्हणून प्रसिद्ध असलेले हे रॅकेट गोध्रा (गुजरात) येथील असून या रॅकेटमधील मुस्ताक अब्दुल भागालिया उर्फ फटाकी (३७) आणि सुलेमान उर्फ सुलिया अब्दुलगणी कवठी या दोघांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आवळल्या आहेत.
सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकमधून साहित्य चोरणाऱ्या टोळीचा जिल्हा पोलीस दलाने पर्दाफाश केला आहे. ताडपत्री गँग म्हणून प्रसिद्ध असलेले हे रॅकेट गोध्रा (गुजरात) येथील असून या रॅकेटमधील मुस्ताक अब्दुल भागालिया उर्फ फटाकी (३७) आणि सुलेमान उर्फ सुलिया अब्दुलगणी कवठी या दोघांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आवळल्या आहेत.
दोन वाहनांसह २४ लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. या ताडपत्री गँगमधील आणखी काही जणांचा तसेच माल विक्री करणाऱ्या दलालांचा तपास लागला असून लवकरच त्यांनाही ताब्यात घेऊ अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील उपस्थित होते.
यावेळी गेडाम म्हणाले की, १ एप्रिल रोजी रात्री कुडाळ येथील हॉटेल राजसमोर व तळेरे कोचरेकर पेट्रोलपंप येथे उभ्या असलेल्या ट्रकची ताडपत्री फाडून आतील खसखस, इलेक्ट्रिकल सामान व डिझनी फ्रोझन हॅण्ड वॉश असा ७ लाख ७३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवून नेला होता.
याबाबतची तक्रार दाखल केल्यानंतर या चोरीमागे मोठे रॅकेट असल्याचा संशय निर्माण झाला होता. त्यादृष्टीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपास केला असता दोन्ही गुह्यांची पद्धत एकच होती. त्यामुळे हे गुन्हे एकाच टोळीने केले असावेत तसेच यापूर्वी राज्यात झालेल्या चोऱ्याच्या पार्श्वभूमीवर गुजरात राज्यातील गोध्रा येथील ताडपत्री गँगचे हे काम असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता.
जिल्ह्यातील चोऱ्यांमध्ये चोरट्यांनी ट्रक व एक गाडी वापरल्याची माहिती मिळाली होती. अधिक तपास केल्यावर या चोऱ्यांसाठी गाडी वापरल्याचे उघड झाले. ती गाडी गुजरातमधील असल्याचे निश्चित होताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुजरातमध्ये जाऊन ताडपत्री गँगमधील मुस्ताक अब्दुल भागालिया उर्फ फटाकी व सुलेमान उर्फ सुलिया अब्दुलगणी कठडी (दोघेही रा. गोध्रा- गुजरात) या दोघांना ताब्यात घेतले.
त्यांनी दिलेल्या कबुली जबाबानुसार चोरीतील माल नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील व्यापारी विनोद भगवानदास बनिया उर्फ वाणी यांना विकल्याचे सांगितले आहे. दरम्यान, दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
इतरांचा शोध सुरू
ताडपत्री गँगच्या या रॅकेटमध्ये अजून कोणाचा समावेश आहे का? यात कोण कोण दलाल आहेत का याबाबत कसून तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक गेडाम यांनी सांगितले.
२४ लाखांचा मुद्देमाल जप्त
या चोरट्यांकडून २४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात १ लाख ७३ हजार ९३० रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश आहे. तसेच ट्रक व गाडीचाही समावेश असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.