सिंधुदुर्ग : तळेरे येथे लक्झरी गाडीसह अवैध दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्कची मोठी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 05:06 PM2018-12-13T17:06:39+5:302018-12-13T17:08:01+5:30
नाताळ आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू वहातुकीवर कणकवली तालुक्यातील तळेरे येथे मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत २ लाख ५५ हजार रुपये किमतीच्या परदेशी बनावटीच्या दारुच्या बाटल्यासह लक्झरी बस असा २२ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कणकवली : नाताळ आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू वहातुकीवर कणकवली तालुक्यातील तळेरे येथे मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत २ लाख ५५ हजार रुपये किमतीच्या परदेशी बनावटीच्या दारुच्या बाटल्यासह लक्झरी बस असा २२ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईत परदेशी बनावटीच्या १ हजार मिलीच्या २ लाख ५५ हजार रुपये किमतीच्या 30 बाटल्या जप्त केल्या आहेत. ही परदेशी बनावटीची दारू ब्रम्हशक्ती ट्रॅव्हल्सच्या खाजगी लक्झरी बस (क्रमांक एमएच 08-इ-9992) मधून केली जात होती . त्यामुळे अवैध दारुच्या बाटल्यासह लक्झरी जप्त केली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या माहिती नुसार आयुक्त डॉ .अश्विनी जोशी यांच्या आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाचे उपआयुक्त यशवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर विभागीय भरारी पथक आणि निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्या पथकाने गुरुवारी दुपारी यशस्वी कारवाई केली.
तळेरे येथे संबधित लक्झरी बस आली असता तीची झडती घेण्यात आली. यावेळी परदेशी बनावटीच्या दारुच्या बाटल्या बसमध्ये आढळून आल्या. या दारू वहातुक प्रकरणी दिगंबर नवनाथ बोडरे ( २९, रा. तोंदले , ता. माण, जि. सातारा ) या आरोपीस अटक करून गुन्हा दाखल केला आहे.
विभागीय उपायुक्त यशवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस.एस.साळवे, उपनिरीक्षक जितेंद्र पवार, जवान जयसिंग खुटावले, सुहास वरुटे, सुखदेव सिद, मोहन पाटील , दिलीप दांगट, दीपक कापसे, नितीन डेरे यांनी ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास कोल्हापूर विभागीय भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक जितेंद्र पवार करीत आहेत.