सिंधुदुर्ग : वेताळबांबर्डेतील डोंगर खचला, वीज वितरणचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 04:17 PM2018-06-18T16:17:57+5:302018-06-18T16:20:25+5:30
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी खणण्यात येत असलेल्या मातीमुळे तालुक्यातील वेताळबांबर्डे येथील डोंगर खचत आहे. या ठिकाणी उच्चदाबाची वीजवाहिनी असलेले चार खांब कोसळण्याच्या स्थितीत आहेत.
सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी खणण्यात येत असलेल्या मातीमुळे तालुक्यातील वेताळबांबर्डे येथील डोंगर खचत आहे. या ठिकाणी उच्चदाबाची वीजवाहिनी असलेले चार खांब कोसळण्याच्या स्थितीत आहेत.
या समस्येकडे महामार्ग व वीज वितरण विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केला असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण झाली असून याकडे वेळीच लक्ष देण्यात यावे, अशी मागणी परिसरातील जनतेसह, वाहनचालकांतून होत आहे.
या चौपदरीकरणाचे काम सुरू असताना आणखी एक धोकादायक काम समोर येत आहे. वेताळबांबर्डे येथील महामार्गाच्या कडेला असलेल्या एका डोंगराच्या मातीचा भराव चौपदरीकरणासाठी मोठ्या प्रमाणात वापरला गेला. या डोंगराचा भराव काढताना मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही काळजी घेतली नसल्याचे या ठिकाणच्या भराव खोदलेल्या स्थितीमुळे दिसून येते.
या डोंगराच्या मध्यभागी उच्चदाबाची वीजवाहिनी घेऊन जाणारे विद्युत खांब असून आता हा डोंगर पोखरल्याने या डोंगराची माती घसरण्यास सुरूवात झाली आहे. या घसरणाऱ्या मातीबरोबरच येथील विद्युत खांबही खाली कोसळण्याच्या स्थितीत आहेत.
या कोसळणाऱ्या डोंगराकडे व येथील विद्युत खांबाच्या सुरक्षिततेकडे संबंधित प्रशासनाने तत्काळ लक्ष न दिल्यास भविष्यात येथील डोंगराची माती व विद्युत खांब कोसळून मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
धोकादायक स्थितीमुळे नागरिकांना होतोय त्रास
कुडाळ तालुक्यात महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम युध्द पातळीवर सुरू असून हे काम सुरू असताना काही ठिकाणी महामार्ग प्रशासनाने व दिलीप बिल्डकॉन कंपनीने सुरक्षिततेचा विचार न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत असून काही ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. याबाबत येथील नागरिक व लोकप्रतिनिधींनी अनेकवेळा आंदोलने केली.