सिंधुदुर्ग : बायोगॅस सयंत्रामुळे गाव धुरमुक्त होईल : जयप्रकाश परब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 12:15 PM2019-01-03T12:15:34+5:302019-01-03T12:18:22+5:30
बायोगॅस सयंत्राचा अवलंब केल्यामुळे ग्रामस्थांच्या पैशाची बचत होऊन वातावरणात प्रदूषण न होता कमी खर्चामध्ये बायोगॅस वापरता येईल. यामुळे आपला गाव धूरमुक्त होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी बापर्डे येथे केले.
सिंधुदुर्ग : बायोगॅस सयंत्राचा अवलंब केल्यामुळे ग्रामस्थांच्या पैशाची बचत होऊन वातावरणात प्रदूषण न होता कमी खर्चामध्ये बायोगॅस वापरता येईल. यामुळे आपला गाव धूरमुक्त होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी बापर्डे येथे केले.
राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम अंतर्गत सन २०१८-१९ मध्ये ग्रामपंचायत बापर्डे येथे बायोगॅस सयंत्र बांधकामाचा शुभारंभ पंचायत समिती गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, जिल्हा परिषद सदस्या अनघा राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी सरपंच संजय लाड, विस्तार अधिकारी सुनील पांगम, ग्रामसेवक शिवराज राठोड, ग्रामपंचायत सदस्य विश्राम नाईकधुरे, गुणवंत राणे, सीमा नाईकधुरे, प्रियांका राणे, रेवती मोंडकर, बापर्डे सोसायटी चेअरमन अजित राणे, संदीप नाईकधुरे, संतोष नाईकधुरे, जिल्हा बँक बापर्डेचे व्यवस्थापक संतोष नारकर, बापर्डेचे तंटामुक्त समिती अध्यक्ष संतोष धुरे, बाळकृष्ण नाईकधुरे, लाभार्थी संतोष नाईकधुरे, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
पंचायत समितीकडून मिळणार १५, ६00 चे अनुदान
यावेळी बायोगॅस सयंत्र उभारणीसाठी जयप्रकाश परब यांनी शासनाकडून १२००० तसेच पंचायत समिती सेसकडून प्रति सयंत्र २००० व बायोगॅस सयंत्रास शौचालय जोडल्यास १६०० रुपये असे एकूण १५६०० रुपये अनुदान मिळणार असल्याचे सांगितले.
तसेच ग्रामपंचायत बापर्डेची कुटुंब संख्या ४७१ असुन सुमारे ४० टक्के कुटुंबांकडे गॅस सिलिंडर आहे. महागाईच्या दृष्टीने विचार केल्यास सिलेंडरची खरेदी करण्यासाठी प्रति कुटुंबाला दरवर्षी १२००० प्रमाणे २२,५६,००० एवढी रक्कम बापर्डे गावामधून गॅस सिलिंडरवर खर्च केली जाते.
जास्तीत जास्त ग्रामस्थंना बायोगॅस सयंत्राचा लाभ
बायोगॅस सयंत्राचा वापर केल्यास बापर्डे गावातील ग्रामस्थांच्या पैशाची बचत होऊन कमी खर्चामध्ये बायोगॅस वापरता येईल व नैसर्गिक साधन संपत्तीचे व्यवस्थापन करून आपला गाव धुरमुक्त करण्यात मदत होईल, असे जयप्रकाश परब यांनी सांगितले.
यावेळी बापर्डे गावचे सरपंच संजय लाड म्हणाले, माझे बापर्डे गाव आपल्या जिल्ह्यात एक आदर्श गाव होण्याच्यादृष्टीने वाटचाल करीत असून या गावातील जास्तीत जास्त ग्रामस्थांना बायोगॅस सयंत्राच्या माध्यमातून लाभ देण्याचा निर्धार आपण केला आहे.