जिल्ह्यातील सहा शाळा विकसित केल्या जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 03:53 PM2020-10-28T15:53:02+5:302020-10-28T15:55:01+5:30
School, Education Sector, sindhudurgnews महाराष्ट्र शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित केल्या जाणार आहेत. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील ३०० शाळांची निवड करण्यात आली असून यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६ शाळांची निवड करण्यात आली आहे.
ओरोस : महाराष्ट्र शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित केल्या जाणार आहेत. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील ३०० शाळांची निवड करण्यात आली असून यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६ शाळांची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, पहिल्या टप्प्यात निवडण्यात आलेली शाळांची यादी अंतिम करण्यासाठी पुष्टी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी करावी आणि १५ दिवसांत कळवावे असे निर्देश देण्यात आले आहेत. मार्चमध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा केल्यानुसार शालेय शिक्षण विभागाने पहिल्या टप्प्यात राज्यात ३०० जिल्हा परिषद शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी निकष निश्चित केले गेले आहेत.
यात शाळांमधील भौतिक सुविधा, शैक्षणिक सुविधा, प्रशासकीय बाबी आदी निकषांची पूर्तता करणाऱ्या शाळांची आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याबाबत २६ ऑक्टोबर रोजी शासन निर्णय झाला आहे. आदर्श शाळा शक्यतो पहिली ते सातवीपर्यंतच्या जिल्हा परिषद शाळा असतील आणि गरज पडल्यास त्यांना आठवीचा वर्ग जोडण्यास वाव असेल. याप्रमाणे राज्यात प्रत्येक तालुक्यातून एक अशा ३०० शाळांची निवड केली गेली आहे.
यात निवडलेल्या शाळांची जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून पुष्टी केली जाणार आहे. याप्रमाणे आदर्श शाळांच्या निकषांच्या आधारे पडताळणी करून त्यात काही बदल असल्यास ते ६नोव्हेंबरपर्यंत राज्य शासनाला कळवावे लागणार आहे. जिल्ह्यातून काही अभिप्राय नसल्यास या यादीतील शाळांना संमती आहे असे गृहीत धरून अंतिम केली जाणार आहे.
इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या आक्रमणापुढे मागे पडत जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना संजीवनी देण्यासाठी राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने घेतलेला आदर्श शाळांचा निर्णय प्राथमिक शाळांना पुन्हा संजीवनी देण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आदर्श शाळा अन्य शाळांना मार्गदर्शन करणार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातून केंद्रशाळा आचरा नंबर १, कणकवली तालुक्यातून खारेपाटण, देवगड तालुक्यातून जामसंडे, कुडाळ तालुक्यातून पावशी, दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी, वैभववाडी तालुक्यातील लोरे या शाळांची निवड करण्यात आली आहे. या आदर्श शाळा अन्य शाळांना प्रेरणा व मार्गदर्शन करण्याचे काम करणार आहेत. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये नमूद स्कूल कॉम्पलेक्स या संकल्पनेप्रमाणे जवळच्या अन्य शाळांतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शैक्षणिक सुविधांचा लाभ घेता येणार आहे.
दप्तरातील साहित्याच्या पलीकडे जाऊन त्यांना शाळेत व शाळेच्या परिसरातील उपलब्ध साधन सामुग्रीमधून विविध विषयांतील ज्ञान अवगत करता यावे या करता त्यांना आठवड्यातून किमान एक दिवस दप्तराच्या ओझ्यातून मुक्तता मिळावी या उद्देशाने प्रत्येक शनिवारी दप्तरमुक्त शाळा हा उपक्रम आदर्श शाळेच्या माध्यमातून प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.