देवगड : मशिनरीमधील तांत्रिक बिघाडामुळे देवगड आनंदवाडी बंदर प्रकल्पाचा गाळ काढण्याचे काम अचानक बंद पडले होते. त्यामुळे मच्छिमारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, हे काम सुरू झाले आहे. देवगडचे अर्थकारण बदलणाऱ्या आनंदवाडी बंदर प्रकल्पाचा गाळ काढण्याच्या कामाला १८ एप्रिलपासून सुरुवात झाली. यासाठी दोन बार्ज व एक ड्रेजर देवगड बंदरात दाखल झाले.गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले होते. मात्र, मशिनरीमधील तांत्रिक बिघाडामुळे हे काम काही दिवस बंद होते. अचानक काम बंद पडल्याने मच्छिमार व देवगडमधील नागरिकही संभ्रमात पडले होते. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे काम बंद होते. रविवारपासून हे काम सुरू होत आहे, असे प्रकल्पाचे ठेकेदार समीर पवार यांनी सांगितले होते. त्यानुसार काम सुरू झाले आहे.
या प्रकल्पाचे सध्या जेटी व भरावाचे काम सुरू असून त्याचबरोबर गाळ काढण्याचा कामालाही सुरुवात झाली. सुमारे १ किलोमीटर क्षेत्रातील गाळ काढण्यात येणार आहे. या बंदरातून अडीच मीटर खोलीचा गाळ काढण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे देवगडच्या कायापालटाबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही त्याचा फायदा होईल.