ओरोस/सिंधुदुर्ग :माझे कुटुंब, माझी जबाबदारी या योजनेंतर्गत नोव्हेंबर-डिसेंबर या कालावधीत सर्व्हे करण्यात आलेल्या ९७ हजार ५९५ कुटुंबातील व्याधीग्रस्त ४५ वर्षावरील १६ हजार ४८४ जणांना आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत आशा कर्मचारी व आरोग्य सेविका यांच्या मार्फत माझे कुटुंब माझे जबाबदारी या योजनेंतर्गत घरोघरी जाऊन ४५ वर्षावरील व्याधीग्रस्त व्यक्तीचा सर्व्हे करण्यात आला होता. यामध्ये ४५ ते ५९ वयोगटातील असलेल्या ६ हजार ९३३ जणांची नोंदणी करण्यात आली तर ६० वर्षावरील ८ हजार ४८३ जणांची नोंदणी करण्यात आली होती.
या नोंदणी करण्यात आलेल्या ४५ ते ५९ वयोगटातील असलेल्या ६,९३३ व्यक्तींपैकी ६,९०८ जणांना तर ६० वर्षावरील नोंदणी करण्यात आलेल्या ८,४८३ व्यक्तींपैकी ८,३५१ जणांना आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. तर या व्यतिरिक्त १,२४१ सर्वसामान्य नागरिकांपैकी १,२२५ जणांना आतापर्यंत कोरोना लसीकरणाचा डोस देण्यात आला आहे.अशाप्रकारे ४५ वर्षावरील जिल्ह्यातील १६ हजार ४८४ जणांना आतापर्यंत कोरोना लसीचा डोस देण्यात आला असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली. उर्वरित ४५ वर्षावरील व्याधीग्रस्त व्यक्तींना कोरोना लस देण्याची प्रक्रिया जिल्ह्यातील विविध शासकीय दवाखान्यांमध्ये सुरू आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी डॉ. कांबळे यांनी केले आहे.