सौर कुंपण प्रकरणाची बोळवण

By admin | Published: December 16, 2014 09:56 PM2014-12-16T21:56:08+5:302014-12-16T23:35:19+5:30

‘मेढा’ करणार नव्याने चौकशी : नेमळे, ओटवणेचा निधी वळवला आंबोलीकडे

Solar fence talk | सौर कुंपण प्रकरणाची बोळवण

सौर कुंपण प्रकरणाची बोळवण

Next

अनंत जाधव - सावंतवाडी -नेमळेसह ओटवणे येथे कमी प्रतीच्या सौर कुंपणाच्या तारा वापरल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांनी दिले. मात्र, एक महिना उलटला, तरी अद्याप ही चौकशीच पूर्ण झाली नसून, जिल्हा नियोजनमधून आलेल्या ३५ लाखाच्या निधीतील काही रक्कम आंबोलीला वर्ग केल्याचा खळबळजनक प्रकार पुढे आला आहे. तसेच चौकशी अधिकाऱ्यांनी चौकशी करण्यापेक्षा फक्त तेथील ग्रामस्थांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यावर ग्रामस्थ समाधानी नसल्याचे स्पष्ट केले आहे.
ओटवणे व नेमळे या दोन गावांना वन्य प्राण्यांपासून मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याने ज्या ठिकाणावरून वन्य प्राणी येतात, त्याच्या हद्दीवर सौर कुंपण घालण्याचा प्रस्ताव वन विभागाने जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला. त्याप्रमाणे जिल्हा नियोजनमधून ३५ लाखाचा निधी या दोन गावांसाठी देण्यात आला. सन २०१३ ते १४ या वर्षात हे काम होणे अपेक्षित होते. त्यानुसार काम हाती घेण्यात आले. पण सौर कुंपणाच्या तारा निकृष्ट दर्जाच्या असून उभारण्यात आलेल्या खाबांना सिमेंट काँक्रिटीकरण नसून ते वरच्यावर बसवण्यात आले आहेत. तसेच काही तारा झाडांना लागल्या आहेत. या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या तळवडेसह नेमळे, ओटवणे येथील ग्रामस्थांनी याबाबत उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांना जाब विचारला होता. त्यानंतर उपवनसंरक्षक यांनी तत्काळ या प्रकरणी चौकशी समिती नेमण्याचे ठरविले. त्याप्रमाणे सहाय्यक उपवनसंरक्षक शिरीष कुलकर्णी यांना चौकशी अधिकारी म्हणून नेमण्यात आले. त्यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली व काही ठिकाणच्या निकृष्ट कामाच्या ठिकाणी नव्याने काम करून घेऊन ग्रामस्थांना दाखविले. मात्र, चौकशी अधिकाऱ्यांच्या या सांगण्याला तक्रारदार बाळा जाधव यांचा आक्षेप आहे.
जाधव यांनी सांगितले की, आम्हाला कामच दाखवण्यात आलेले नाही आणि आमच्या चौकशीचे निरसनही झाले नाही. तसेच जिल्हा नियोजनमधून आलेला ३५ लाख रुपयांचा निधी ओटवणे व नेमळे या दोन गावांवर खर्च करणे अपेक्षित असताना हा निधी आंबोलीकडे परस्पर का वर्ग करण्यात आला, याचे गौडबंगाल असून, सौर कुंपणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. या कामाला निधी जिल्हा नियोजनकडून मिळाला आहे, असे सांगून या प्रकरणाची चौकशी नियोजन विभागाने करावी, अशी मागणी जाधव यांनी केली आहे.
सावंतवाडी वनक्षेत्रपाल संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करण्यात आले होते. मात्र, या चौकशीपासून त्यांना बाजूला ठेवण्यात आल्याचे कोठेही दिसून येत नसून चौकशीचा अहवाल अद्याप वनविभागाला सादर करण्यात आला नाही. आता सौर कुंपणाचा विषय आपला नसून ‘मेढा’चा असून ‘मेढा’चे अधिकारी पुणे येथून येत्या आठ ते दहा दिवसात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच उपवनसंरक्षकांनी चौकशीचे अधिकार दिले नव्हते, तर फक्त ग्रामस्थांचा गैरसमज दूर करण्यास सांगितले होते. त्यामुळे चौकशी अहवाल देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, सौर कुंपणाचा ठेका देण्यात आला ती व्यक्ती एका राजकीय पक्षाशी संबंधित असून त्यातूनच या चौकशीला चालढकलपणा होत असल्याचे बोलले जात आहे. जर या प्रकरणाची चौकशी वरिष्ठ पातळीवरून झाल्यास यातील गौडबंगाल बाहेर येईल, असे मत वनविभागाचे काही कर्मचारी खासगीत व्यक्त करीत आहेत.


वनविभागाने अद्याप चौकशी केली नसून आम्हाला चौकशीवेळी बोलावणार असल्याचे सांगितले. परंतु प्रत्यक्षात आम्हाला बोलावले नाही. याबाबत आम्ही असमाधानी असून अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी बाळा जाधव यांनी केली.
- बाळा जाधव, सावंतवाडी

3सौर कुंपणाची चौकशी करण्यास आपणास सांगितले नव्हते. फक्त ग्रामस्थांतील गैरसमज दूर करण्यास करण्यास सांगण्यात आले होते,
- शिरीष कुलकर्णी, सहाय्यक उपवनसंरक्षक

उपवनसंरक्षकांकडून टोलवाटोलवी
सौर कुंपणामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितपणा असतानाही या प्रकाराची चौकशी व्हावी, यासाठी शिवसेना तसेच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उपवनसंरक्षकांना घेराव घातला असता याची एका महिन्यात चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगितले होते. मात्र, अद्याप चौकशी करण्यात न आल्याने उपवनसंरक्षकांची राजकीय पक्षांना ही टोलवाटोलवी म्हणावी लागेल.

Web Title: Solar fence talk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.