मालवण : जिल्ह्यातील रापण आणि गिलनेटधारक मच्छिमारांना भेडसावणाऱ्या मत्स्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मालवणात लवकरच मत्स्य दुष्काळ परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे.
अवकाळी पाऊस तसेच वादळी वाऱ्यांचा फटकाही मत्स्य व्यवसायास बसत असल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ही परिषद घेतली जाणार आहे. दुष्काळ परिषदेचे स्वरूप व रुपरेषा आखण्यासाठी जिल्ह्यातील पारंपरिक मच्छिमारांची बैठक २० जानेवारी रोजी मालवणात होणार असल्याचे मच्छिमारांनी सांगितले.मत्स्य दुष्काळाच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासंदर्भात पारंपरिक मच्छिमारांची बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत मत्स्य दुष्काळ परिषद आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आली. यावेळी मिथुन मालंडकर, आबा वाघ, महेंद्र पराडकर, नितीन परुळेकर, भाऊ मोरजे, वसंत गावकर, संतोष देसाई, रॉकी डिसोजा, संजय जामसंडेकर, संदीप शेलटकर, नारायण शेलटकर आदी उपस्थित होते.या परिषदेस पारंपरिक मच्छिमारांसाठी कार्यरत असलेल्या देश व राज्यस्तरावरील विविध मच्छिमार संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, मत्स्य अभ्यासक यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. तसेच लोकप्रतिनिधींनाही या बैठकीस आमंत्रित करून त्यांची मत्स्य दुष्काळाबाबतची भूमिका जाणून घेतली जाणार आहे.सिंधुदुर्गसह राज्यातील सागरी पारंपरिक मच्छिमार शासनाकडे मत्स्य दुष्काळ जाहीर करण्याची मागणी गेले वर्षभर करीत आहेत. परंतु मत्स्य दुष्काळ जाहीर केला गेलेला नाही. मत्स्य दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासकीय निकष आडवे येत असतील तर ते बदलण्याची आज गरज आहे इतकी परिस्थिती गंभीर आहे.यावर्षीच्या मत्स्य हंगामात बांगडा, पापलेट, तारली, सौंदाळा, पेडवे, कोळंबी आदी महत्त्वाचे मासे पारंपरिक मच्छिमारांना मिळण्याचे प्रमाण प्रचंड घटले आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छिमार मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.बेकायदेशीर मासेमारीमुळेच मत्स्य दुष्काळमासे मिळत नसल्याने मासेमारीचे प्रमाण घटले आहे. मच्छिमारांच्या जेवणातूनही मासे गायब झाले आहेत. हीच परिस्थिती शासनासमोर व्यापक स्वरूपात मांडून पारंपरिक मच्छिमारांना न्याय मिळवून देण्यासाठी मत्स्य दुष्काळ परिषदेचे आयोजन करणार असल्याचे पारंपरिक मच्छिमारांनी सांगितले. परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्स आणि एलईडी पर्ससीनद्वारे होणारी बेकायदेशीर अतोनात मासेमारी यामुळे मत्स्य दुष्काळाचा प्रश्न गंभीर बनला आहे.