सावंतवाडी : राजन तेली हा विषय काँग्रेससाठी केव्हाच संपला आहे. त्यामुळे त्यांच्यावर आम्ही बोलून वेळ वाया घालविणार नाही. त्यांचा स्वत:च्या पक्षावरच विश्वास उरला नाही, ते नारायण राणेंना काय तत्त्वज्ञान शिकवणार, अशी टीका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी केली. ते सावंतवाडीत येथे पत्रकारांशी बोलत होते.यावेळी प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर, निगुडे सरपंच झेवियर फर्नांडिस, नूतन शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, गुरू वारंग, संतोष जोईल, अरुण भिसे, दिलीप भालेकर, आदी उपस्थित होते.संजू परब म्हणाले, अकार्यक्षम पालकमंत्री ठरल्यानेच त्यांच्या मित्रपक्षातीलच लोक त्यांच्यावर टीका करू लागले आहेत. पालकमंत्री देवगड मतदारसंघाला निधी दिल्याचे सांगत आहेत, पण आमदार नीतेश राणे यांनी स्वत:च्या हिमतीवर सरकारकडून निधी आणला असून, त्यासाठी त्यांना उपोषणही करावे लागले आहे. त्यामुळे त्याचे श्रेय पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेऊ नये, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. काँग्रेसच्या काळात पालकमंत्री नारायण राणे यांनी त्यांचा बिमोड केला होता. मात्र, केसरकर यांचे प्रशासनातील अधिकारी कोण ऐकत नाही. त्यामुळेच हे धंदे फोफावले असून काँग्रेस योग्य आंदोलन करेल, असा इशाराही यावेळी परब यांनी दिला आहे. आम्हाला पालकमंत्र्यांवर टीका करण्यात कोणताही रस नाही. मात्र, जनतेच्या हिताचे प्रश्न सुटले पाहिजे. यासाठीची आमची बांधीलकी असून ती कायम राहाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.राजन तेली यांना स्वत:ची जेटी करता आली नाही. त्यांनी नारायण राणे यांच्यावर का टीका करावी? ज्या पक्षात तेली आहेत, त्याच पक्षावर त्यांचा विश्वास उरला नाही. त्यामुळेच ते प्रशासनावर टीका करीत असून, आमच्यासाठी तेली हा विषय संपल्याने यापुढे त्यांच्यावर टीका करणार नाही, असे डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)युवक काँग्रेसची सावंतवाडीत आज बैठकराजापूर लोकसभा मतदारसंघातील युवक पदाधिकाऱ्यांची आज, सोमवारी येथील माजी खासदार कार्यालयात सकाळी अकरा वाजता बैठक होणार आहे. या बैठकीला ‘युवक’चे नेते हिम्मत सिंग तसेच सरचिटणीस नंदा म्हात्रे उपस्थित राहणार आहेत.
राजन तेलींवर बोलणे म्हणजे वेळ वाया
By admin | Published: December 28, 2015 1:04 AM