थकित वेतनामुळे एसटी कर्मचारी त्रस्त, ९ नोव्हेंबर रोजी आक्रोश आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 08:02 PM2020-10-27T20:02:55+5:302020-10-27T20:04:59+5:30

StateTransport, sindhdurugnnews एसटी कामगारांना थकित वेतन, देय झालेले वेतन, महागाई भत्त्याची थकबाकी तसेच शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सण उचल न मिळाल्यास कर्मचारी आपल्या स्वत:च्या घरासमोर आपल्या कुटुंबीयांसह ९ नोव्हेंबर २०२० रोजी पगार दो...आक्रोश आंदोलन छेडणार असल्याचे मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेचे मुंबई प्रदेश सचिव दिलीप साटम यांनी म्हटले आहे.

ST employees suffer due to overdue salaries | थकित वेतनामुळे एसटी कर्मचारी त्रस्त, ९ नोव्हेंबर रोजी आक्रोश आंदोलन 

थकित वेतनामुळे एसटी कर्मचारी त्रस्त, ९ नोव्हेंबर रोजी आक्रोश आंदोलन 

Next
ठळक मुद्देदिलीप साटम यांची माहिती ९ नोव्हेंबरला आंदोलन छेडणार

कणकवली : एसटी कामगारांना थकित वेतन, देय झालेले वेतन, महागाई भत्त्याची थकबाकी तसेच शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सण उचल न मिळाल्यास कर्मचारी आपल्या स्वत:च्या घरासमोर आपल्या कुटुंबीयांसह ९ नोव्हेंबर २०२० रोजी पगार दो...आक्रोश आंदोलन छेडणार असल्याचे मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेचे मुंबई प्रदेश सचिव दिलीप साटम यांनी म्हटले आहे.

त्यानंतरही कामगारांना थकित वेतन, थकित महागाई भत्ता व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सण उचल न मिळाल्यास कामगारांना प्रशासनाविरोधात तीव्र संघर्ष करावा लागेल, असेही त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

कोरोना विषाणूच्या महामारीत एसटी कर्मचारी जीवाची बाजी लावून दिवस-रात्र काम करीत आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत शासनाच्या आदेशानुसार परराज्यातील मजुरांना थेट त्यांच्या राज्यात सोडण्याची कामगिरी एसटीने पार पाडली असून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहतूक तसेच सध्या मुंबई बेस्टची बस वाहतूकही एसटी कर्मचारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत करीत आहेत. यामध्ये महामंडळाचे बरेचसे कर्मचारी कोरोनाबाधित झाले असून सुमारे ७३ कर्मचारी मृत झाले आहेत.

अशा कर्मचाऱ्यांपैकी बहुतांश कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना अद्याप विमा कवचाची ५० लाखांची मदत प्रशासनाने दिलेली नाही. कोरोना कालावधीत कामगार प्रतिकूल परिस्थितीत काम करीत असूनही त्यांना ऑगस्टपासून वेतन दिलेले नाही. प्रशासनाने जुलै २०२० या महिन्याचे वेतन ७ ऑक्टोबरला देताना सक्तीच्या रजेवर पाठविलेल्या कामगारांपैकी काही कामगारांचे रजा कालावधीचे वेतन कपात केल्यामुळे एक महिन्याचे वेतनही अल्प प्रमाणात दिलेले आहे.

दिवाळी सणापूर्वी दोन महिन्यांचे थकित वेतन, महागाई भत्त्याची थकबाकी व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सण उचल मिळावी या मागणीसाठी संघटनेचे पदाधिकारी सर्व पातळीवर लक्ष वेधण्यासाठी व एसटी कामगारांना वेतन मिळण्यासाठी २ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदन देतील. त्यानंतरही वेतन न मिळाल्यास पगार दो... आक्रोश आंदोलन छेडण्यात येईल, असेही साटम यांनी म्हटले आहे.

वेतन नसल्याने कामगारांमध्ये प्रचंड असंतोष

कामगारांमध्ये असलेल्या असंतोषाबाबत संघटनेने वारंवार पत्रव्यवहार करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. मात्र, प्रशासनाने हा थकित महागाई भत्ता राज्य परिवहन कामगारांना कामगार कराराच्या तरतुदीनुसार दिलेला नाही. त्यामुळे कामगारांतून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

सध्याच्या एसटीच्या बिकट आर्थिक परिस्थितीस कामगार जबाबदार नाहीत. कोरोनाच्या कालावधीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कामगार काम करीत असूनही त्यांनी केलेल्या कामाचे वेतन त्यांना मिळत नसल्याने कामगारांमध्ये प्रचंड असंतोष वाढला आहे.

Web Title: ST employees suffer due to overdue salaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.