राज्य सरकार महिलांवरील अत्याचाराबाबत असंवेदनशील !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 02:34 PM2020-10-12T14:34:45+5:302020-10-12T14:37:30+5:30
Women, sindhudurg, Tahasildar महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे . या साऱ्यांच्या विरोधात आवाज उठवूनही सरकार व मुख्यमंत्री संवेदनशील नाहीत असा आरोप करत भाजपा कणकवली तालुका महिला आघाडीच्यावतीने तहसीलदार आर.जे. पवार यांच्याकडे निवेदन सुपूर्द करण्यात आले.
कणकवली : महिला सुरक्षिततेबाबत त्वरित कडक कायदे बनविण्यात यावेत. अशी मागणी करतानाच महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे . या साऱ्यांच्या विरोधात आवाज उठवूनही सरकार व मुख्यमंत्री संवेदनशील नाहीत असा आरोप करत भाजपा कणकवली तालुका महिला आघाडीच्यावतीने शासनाला देण्यासाठी तहसीलदार आर.जे. पवार यांच्याकडे सोमवारी निवेदन सुपूर्द करण्यात आले.
यावेळी भाजपाच्या प्रदेश सदस्या प्रज्ञा ढवन , माजी जिल्हापरिषद अध्यक्षा संजना सावंत , पंचायत समिती उपसभापती दिव्या पेडणेकर , महिला आघाडी तालुकाध्यक्षा हर्षदा वाळके , शहराध्यक्षा प्राची कर्पे , साक्षी वाळके , जिल्हा कार्यकारणी सदस्या गीतांजली कामत , स्वाती राणे , नगरसेविका प्रतीक्षा सावंत , मेघा गांगण , कविता राणे आदी उपस्थित होत्या .
यावेळी तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की , महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बलात्कार , अत्याचार , विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरुच आहे . कोरोना महामारी सारख्या अतिसंवेदनशील काळातही कोविड सेंटर व हॉस्पिटल्समध्ये महिलांवरील अत्याचार आणि विनयभंगाचे सत्रही सुरूच आहे. भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांनी प्रत्येक घटनेचे गांभीर्य ओळखून संबधित घटनांचा प्रत्यक्ष पाठपुरावा केला. पीडित महिलांच्या पाठीशी राहत स्थानिक पोलिस स्टेशनला भेट देऊन वेळोवेळी कारवाईची मागणी केली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संबधित घटनांबाबत निवेदन पाठविले . मात्र, त्या निवेदनाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला साधा विधायक प्रतिसाद देण्याची शिष्टाई देखील मुख्यमंत्र्यांनी दाखविली नाही . यावरून हे सरकार महिला सुरक्षिततेबाबत किती असंवेदनशील व निष्क्रिय आहे हेच स्पष्ट होते.
या सरकारचा प्रशासनावर देखील अंकुश नाही. त्यामुळे प्रशासन देखील महिला अत्याचारांच्या घटनांना गांभीर्याने घेत नाही . भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशतर्फे २२ सप्टेंबर २०२० रोजी महाराष्ट्रामधील संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोविड सेंटर्स व हॉस्पिटल्स मध्ये महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या घटनांना वाचा फोडण्यासाठी एक दिवसीय आंदोलनही करण्यात आले होते . परंतु तरीही असंवेदनशील महाविकास आघाडी सरकारने कोणतेही पाऊल उचलले नाही .
त्यामुळे भाजपा महिला मोर्चा , महाराष्ट्र प्रदेशने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात व त्याच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव राज्यव्यापी आंदोलन छेडले आहे . तसेच महिला सुरक्षित होण्यासाठी त्वरित कडक कायदे बनविण्यात यावे अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे .