कणकवली : सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, या कोकणातील पाच जिल्ह्यांत प्रचंड वन वृक्षतोड होत आहे. यातील प्रत्येक जिल्ह्यातून दररोज १०० ट्रक लाकूड पश्चिम महराष्ट्र, कर्नाटक, गोवा, मुंबई या भागात जाते. कोट्यवधी वृक्षांची कत्तल होत असताना ती थांबविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न न करता १ जुलैला जे दोन कोटी वृक्ष लावले जाणार आहेत, म्हणून वन व महसूल खाते आपली पाठ थोपटून घेत आहे, हे हास्यास्पद आहे.अशी घणाघाती टीका सिंधुदुर्ग जिल्हा वृक्षमित्र सेवा संघाचे अध्यक्ष प्रा. महेंद्र नाटेकर यांनी केली.सिंधुदुर्ग जिल्हा वृक्षमित्र सेवा संघाची सभा येथील वृक्षमित्र हॉलमध्ये झाली. यावेळी शांताराम नारकर, विश्वनाथ केरकर, प्रा. सुभाष गोवेकर, बाबूराव आरेकर, सुभाष कांबळी, संदेश पाताडे, आदी उपस्थित होते. प्रा. नाटेकर पुढे म्हणाले, दोन कोटी वृक्ष लावतात ही आनंदाची गोष्ट आहे; परंतु ते जगविण्याचे नियोजन करून त्यांची समर्थ कार्यवाही होणार का? आतापर्यंतचा अनुभव लक्षात घेतला तर २५ टक्केही वृक्ष जगविले जात नाहीत. लावलेले वृक्ष जगवायचे असतात, याचेही कोणाला फारसे भान दिसत नाही. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या परिसरात स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी अवलोकन करावे, म्हणजे आम्ही काय म्हणतो, याची त्यांना प्रचिती येईल. (वार्ताहर)रक्षकच झाले वृक्षभक्षकवन व महसूल खात्याच्या आशीर्वादाने प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होत असते. वृक्षांचे रक्षण व्हावे म्हणून त्यांच्या नेमणुका झाल्या असतात. पण, आपले कर्तव्य विसरून बहुसंख्य रक्षक वृक्षभक्षक झाले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात एक ब्रॅकेटच बनले आहे. हे बॅ्रकेट फोडून त्यांना कठोर शासन केले असते, तर दोन कोटी वृक्ष लावण्याची पाळी आली नसती. जंगलातील जुुनाट वृक्ष तोडून ते नेण्यासाठी वाहतूक पास दिले जातात; परंतु अशा परवानगीच्या निमित्ताने वनअधिकाऱ्यांशी संगनमताने लहान, थोर सारेच वृक्ष तोडले जातात. काही वृक्ष तोडून पाच सहा महिन्यांनी सुकल्यांनतर जुनाट झाल्याचे भासवून वाहून नेले जातात. तेच तेच पास पुन्हा वापरले जातात. जेवढे वृक्ष तोडण्याची परवानगी दिलेली असते, त्याच्या अनेकपटींनी वृक्षतोड केली जाते. वृक्षतोडीमुळे कोकण झाले भकासअवैध वृक्षतोडीला आळा बसावा यासाठी रस्त्यावर चेक नाके ठेवले आहेत. हेी चेक नाके भ्रष्टाचार नाके झाले आहेत. शेकडो वाहने या नाक्यावर बराच वेळ थांबतात. साटेलोटे झाल्यावर काही वेळाने निघून जातात. या नाक्यावर लाकूड जप्त करून ठेवल्याचे दिसत नाही. लोकांच्या दबावामुळे ठिकठिकाणी लाकडे जप्त केली जातात; पण लोकक्षोभ शांत झाल्यावर ते लाकूड गायब होते. असलेले कोकण भकास झाले असून, तीव्र पाणीटंचाई निर्माण होत आहे. कायद्याचे कठोर पालन हाच यावरील सर्वांत चांगला उपाय आहे.
वृक्ष लागवडीपेक्षा कत्तल थांबवा
By admin | Published: June 16, 2016 9:47 PM