गोवा-पत्रादेवी तपासणी नाक्यावर पोलिसांकडून कडक तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 05:49 PM2021-05-14T17:49:19+5:302021-05-14T17:50:06+5:30
CoronaVirus Goa Border Sindhudurg : गोवा-महाराष्ट्र सीमेवर पत्रादेवी तपासणी नाक्यावर गोव्यात नोकरीसाठी जाणाऱ्या युवक-युवतींना कोरोना निगेटिव्ह दाखल्याची बुधवारपासून सक्ती करण्यात आली होती. गुरुवारपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्य सरकारकडून कडक निर्बंध करण्यात आले. कोरोना अहवाल निगेटिव्ह असल्यास गोव्यात प्रवेश देण्यात येत होता. गोवा तपासणी नाक्यावर सकाळी दहा वाजेपर्यंत सर्वांची कडक तपासणी करून प्रवेश देण्यात येत होते.
बांदा : गोवा-महाराष्ट्र सीमेवर पत्रादेवी तपासणी नाक्यावर गोव्यात नोकरीसाठी जाणाऱ्या युवक-युवतींना कोरोना निगेटिव्ह दाखल्याची बुधवारपासून सक्ती करण्यात आली होती. गुरुवारपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्य सरकारकडून कडक निर्बंध करण्यात आले. कोरोना अहवाल निगेटिव्ह असल्यास गोव्यात प्रवेश देण्यात येत होता. गोवा तपासणी नाक्यावर सकाळी दहा वाजेपर्यंत सर्वांची कडक तपासणी करून प्रवेश देण्यात येत होते.
सकाळच्या वेळी सिंधुदुर्गमधून नोकरी-धंद्यासाठी जाणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने तपासणीसाठी वेळ लागत होता. यामुळे गोवा तपासणी नाक्यावर गर्दी दिसून आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जवळपास १५ हजार युवक-युवती गोव्यामध्ये नोकरीसाठी जातात. यापूर्वी या युवक-युवतींच्या जाण्या-येण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यावेळी महाराष्ट्र-गोवा यांनी यावर तोडगा काढून त्यांच्या येण्या-जाण्याचा मार्ग मोकळा केला होता.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अचानक तपासणी सुरू केल्याने गोवा तपासणी नाक्यावर सकाळच्या वेळी गर्दी व वाहनांची वर्दळ दिसून आली. कोरोनाच्या नावाखाली सर्वसामान्यांची गळचेपी केली जात आहे. बाहेर पडल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे. आज आर्थिक परिस्थिती ठासळल्याने लोकांचा चरितार्थाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
लोक दंड कोठून भरणार, हे असंच चालू राहिल्यास कोरोना हद्दपार होईल काय? नाही. गतवर्षीप्रमाणे हीच परिस्थिती राहिली तर? असे प्रश्न नोकरदार, छोट्या उद्योग व सामान्य नागरिकांना पडले आहेत. कोविशिल्ड लस घेतलेले प्रमाणपत्र, ई-पास, कोरोना रॅपिड टेस्ट रिपोर्ट असणाऱ्या नोकरदार युवक-युवतींना गुरुवारी प्रवेश दिल्याचे गोवा पोलिसांकडून सांगण्यात आले.
गोव्यात ये-जा करणारी वाहतूक काही वेळ बंद
गुरुवारी सकाळी कोरोना निगेटिव्ह अहवाल तपासणी सुरू केल्यानंतर प्रवेश देण्यात येत होता. त्यामुळे गोव्यात जाणाऱ्या नोकरदार वर्गाने महाराष्ट्र हद्दीत गोव्यात जाणारी व गोव्यातून येणारी वाहतूक काही वेळी बंद होती. डंपर व इतर माल वाहतूक खुलेआम सुरू असल्याने युवक-युवती आक्रमक झाले होते. सकाळच्या वेळी दोन्ही बाजूने ट्राफिक जाम झाले आहे. दुपारनंतर गोव्या तपासणी नाक्यावर वाहनांची व प्रवाशांची तुरळक गर्दी होती. कोरोना अहवाल तपासणी करून प्रवेश देण्यात येत होते.