मालवण : शिक्षण घेत असताना मुलभूत गरजा वेळच्या वेळी मिळाल्यास विद्यार्थ्यांना अभ्यास किंवा अध्ययन करणे सोपे जाते. मात्र, शासकीय तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांवर तासिका चुकवून दुसऱ्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी रांगेत उभे राहण्याची नामुष्की ओढवली आहे.
गेले काही महिने अपुऱ्या पाण्याची समस्या असतानाच आता आठ दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा होतो. त्यामुळे मालवण पालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या पाणी प्रश्नावर दोन दिवसांत कार्यवाही न झाल्यास विद्यार्थ्यांनी २ जानेवारी रोजी पाण्यासाठी पालिकेवर धडक देऊन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.मालवण कुंभारमाठ येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे अकराशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. तर येथील वसतिगृहात १५० विद्यार्थी व १०० विद्यार्थिनी राहतात.
शिक्षक व कर्मचारी दीडशेच्या आसपास आहेत. तंत्रनिकेतनला पालिकेच्या धामापूर नळपाणी योजनेवरून पाणीपुरवठा केला जातो. तंत्रनिकेतनच्या मुख्य पाईपलाईनवर खासगी नळजोडणी देण्यात आल्याने अपुरा पाणीपुरवठा गेल्या अनेक माहिन्यांपासून सुरु आहे.गेले काही दिवस आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थी व शिक्षकांना पुरेसे पाणी मिळत नाही. तंत्रनिकेतन येथे असलेल्या पाच बोअरवेल पैकी तीन बोअरवेल बंद असून दोन बोअरवेलमधून अवघ्या एक ते दोन तासासाठीच पाणीपुरवठा होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत.शासकीय तंत्रनिकेतन येथे ४ ते ६ जानेवारी या कालावधीत विभागस्तरीय क्रीडा स्पर्धा होणार असून स्पर्धेसाठी हजारो विद्यार्थी सहभागी होणार आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर स्पर्धेतील खेळाडू तसेच विद्यार्थ्यांचे पाण्याअभावी मोठ्या प्रमाणावर हाल होणार आहेत. क्रीडा महोत्सवापूर्वी पाण्याचा प्रश्न निकाली काढावा अन्यथा २ जानेवारी रोजी मालवण पालिकेवर धडक आंदोलनाचा इशारा संतप्त विद्यार्थ्यांनी दिला आहे.पाण्यासाठी भटकंतीदिवसाला ८० हजार लिटर पाण्याची आवश्यकता असताना आठवड्यातून केवळ एकदाच ५० ते ६० हजार लिटर पाणी उपलब्ध होते. मात्र, तेही अशुद्ध असल्याने मालवण शासकीय तंत्रनिकेतन वसतिगृहातील विद्यार्थ्यांसह शिक्षक व कर्मचाऱ्यांनाही पाण्यासाठी भटकावे लागत आहे.