मळेवाड : बहुचर्चित तळवणे-वेळवेवाडी पुलाचे काम गेले पंधरा दिवस बंद आहे. प्रसंगी पोलीस संरक्षण घ्या, पण काम सुरू करावे, अशी आक्रमक मागणी तळवणे ग्रामस्थांनी केली. तळवणेवासियांनी सावंतवाडी उपविभागीय कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांना घेराव घालून पुलाचे बंद कामाबाबत जाब विचारत घेराव घातला. तळवणे परिसरातील महत्वाचा पूल म्हणून ओळखला जाणाऱ्या या पुलासाठी गेली ३५ वर्षे पंचक्रोशी संघर्ष करीत आहे. २०१३ मध्ये अखेर काम सरू झाले. पण गेल्या पंधरा दिवसापासून हे काम पुन्हा बंद करण्यात आले आहे. त्यामुळे हे काम सुरू केव्हा करणार, यावर योग्य निर्णय कधी घेण्यात येणार यासंदर्भात विचारणा करण्यासाठी ग्रामस्थांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागात धडक दिली. यावेळी ग्रामस्थांनी आक्रमक होत पुलाचे काम सुरू करून आम्हाला न्याय द्या, अशी मागणीही यावेळी ग्रामस्थांनी केली. यावर कार्यालयातील अभियंता चव्हाण यांनी आम्हाला काम सुरू करण्यासाठी काहीही अडचण नाही. पण काही लोक काम बंद पाडतात. यावर ग्रामस्थांनी काम सुरू करण्यासाठी घटनास्थळी पोलीस संरक्षण घ्या. अडथळा करणाऱ्यांवर कारवाई करा आणि काम पूर्ण करा, अशी मागणी केली. यावर सोमवारपर्यंत राहिलेल्या त्रुटी पूर्ण करून काम सुरू करणार, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले. भूसंपादनाची प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही, ना शेतकऱ्यांना जमिनीचे पैसे मिळाले. प्रत्येकवेळी लोकप्रतिनिधी आश्वासने देतात आणि अधिकारी वर्ग पुलाचे काम ८० टक्के झाले, असे सांगतात. प्रत्यक्ष वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. यावेळी तळवणे सरपंच मिलिंद कांबळी, ग्रामस्थ बाळकृष्ण कांबळी, गोविंद केरकर, मोहन कांबळी, शरद हरमलकर, रामदास कांबळी, संजय साळगावकर, भगवान शेंडेकर, रमाकांत कांबळी, नकुल कांबळी, पांडुरंग नाईक, लवू कांबळी, अनंत साळगावकर, भरत कांबळी, विलास साळगावकर, प्रकाश कांबळी, सुनील कांबळी यासह शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रूपेश राऊळ, दिलीप सोनुर्लेकर, चंद्रकांत कासार यांनी ग्रामस्थांच्यावतीने अधिकाऱ्यांना धारेवर धरले. आपल्या माडबागायतीवर पाणी सोडून पुलासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्या हाती अद्याप एक छदामी पडला नाही, याचासुद्धा काहीच विचार करण्यात आला नाही. (वार्ताहर) पाने पुसण्याचेच कार्य तळवणे वेळवेवाडी पूल हे गेली ३५ वर्षे प्रकाशझोतात आहे. पूल पूर्ण कधी होणार, याकडे ग्रामस्थ डोळे लावून आहेत. पण प्रत्येकवेळी लोकप्रतिनिधी आणि शासन अधिकारी यांच्याकडून त्यांना पाने पुसण्याचे काम झाले आहे.
उपविभागीय अभियंत्यांना जाब विचारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2016 9:47 PM