सिंधुदुर्गनगरी : पारंपरिक आणि मिनी पर्ससीन मच्छिमार यांच्यात मच्छिमारी व्यवसायावरून झालेल्या वादावर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यशस्वी तोडगा काढला आहे. पारंपरिक मच्छिमारी व्यवसायिकांनी ० ते ५ नॉटीकल मैलापर्यंत तर मिनी पर्ससीनधारकांनी ५ ते १२ नॉटीकल मैलापर्यंत मच्छिमारी करण्याची मर्यादा शनिवारी मच्छिमारांच्या पार पडलेल्या बैठकीत पालकमंत्र्यांनी आखून दिली. या निर्णयावर पारंपरिक व पर्ससीन मच्छिमारांनी संमती दर्शविली असून आचरा गावात या निर्णयामुळे शांततेचे व सलोख्याचे वातावरण निर्माण होणार असल्याचा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. आचऱ्यामध्ये स्थानिक मच्छिमारांमध्ये मासेमारी व्यवसायावरून वाद निर्माण झाला होता. पारंपरिक मच्छिमार व पर्ससीन यांच्यात उद्रेक निर्माण होऊन वातावरण तंग झाले होते. जाळपोळ यासारख्या घटनादेखील घडल्या होत्या. या वादावर तोडगा काढण्यासाठी मच्छिमारांची शनिवारी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, पारंपरिक व मिनी पर्ससीन मच्छिमारांचे प्रतिनिधी, आचरा गावचे सरपंच, मत्स्य विभागातील अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी माहिती देताना खासदार विनायक राऊत म्हणाले की, आचरा गावात उद्रेक झाला होता. या उद्रेकावर मार्ग काढण्याची व आचरा गावात शांती, गावपण टिकविले जावे यासाठी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. आचरा गावात १८ मिनी पर्ससीन मच्छिमार तर १६० पारंपरिक मच्छिमार आहेत. त्यांनी समुद्रात किती अंतरापर्यंत मच्छिमारी करावी यासाठी निर्बंध आखून देण्यात आले. यामध्ये ० ते ५ नॉटीकल मैलमध्ये पारंपरिक मच्छिमारांनी तर ५ ते १२ नॉटीकल मैलमध्ये मिनी पर्ससीन मच्छिमारांनी मासेमारी करावी असा निर्णय पालकमंत्र्यांनी दिला. या निर्णयावर दोन्ही बाजूच्या मच्छिमारी प्रतिनिधींनी राजी होत सकारात्मकता दर्शविली. वादावर काढलेला पर्याय यशस्वी झाल्यास जिल्ह्यात इतर ठिकाणीही असेच वाद मिटविले जातील. सध्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात पर्ससीन, पारंपरिक, यांत्रिकी व परराज्यातील पर्ससीनधारकांमध्ये मासेमारीवरून वाद सुरु आहेत. या वादावरही कायमस्वरूपी तोडगा काढला जाणार आहे. वरिष्ठ स्तरावर बैठक घेऊन कायद्याचा अंमल होईल यादृष्टीने तोडगा काढला जाणार आहे. (प्रतिनिधी)
पर्ससीन आणि पारंपरिक वादावर यशस्वी तोडगा : विनायक राऊत
By admin | Published: November 21, 2015 10:50 PM