पोटासाठी अशीही धोकादायक वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 12:54 AM2020-01-13T00:54:41+5:302020-01-13T00:55:24+5:30
देवरूख : गाडीच्या दोन बाजूला खुर्च्या लावलेल्या पाहिल्या की त्याचे नवलच वाटते. परजिल्ह्यातील काही व्यापारी दुचाकीवरून धोकादायकरित्या वाहतूक करत ...
देवरूख : गाडीच्या दोन बाजूला खुर्च्या लावलेल्या पाहिल्या की त्याचे नवलच वाटते. परजिल्ह्यातील काही व्यापारी दुचाकीवरून धोकादायकरित्या वाहतूक करत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. धोकादायक वाहतुकीमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. तरीही पोट भरण्यासाठी असे व्यवसाय करणारे अनेकजण नजरेला पडतात.
पोटासाठी वाटेल ते करण्याची अनेकांची तयारी असते. पोट भरण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. आपल्यासह कुटुंबांचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. त्यासाठी जीवावर उदार होऊन अनेकजण काम करताना दिसतात. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन पोट भरण्यासाठी विविध् क्लुप्त्या वापरून उदरनिर्वाह केला जातो.
पावसाळा संपल्यानंतर परजिल्ह्यातील व्यापारी संगमेश्वर तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होतात. यामध्ये चटई, खुर्च्या, टाकाऊ वस्तू (भंगार) गोळा करणाऱ्यांचा समावेश आहे. हे व्यापारी दुचाकीवरून माल घेऊन शहरांसह ग्रामीण भागातून फिरत असतात. दुचाकीच्या दोन्ही बाजुला किंवा टाकीवर व मागील बाजुला विक्रीचे सामान बांधतात. ही वाहतूक अत्यंत धोकादायक पध्दतीची आहे.
वाहनावरून होणारी ही वाहतूक धोक्याची आहे, याची कल्पना दुचाकी चालकाला असते. तरीदेखील हा धोका पत्करून ही वाहतूक करून गावोगावी खुर्च्या विकण्यासाठी ही मंडळी दाखल होत असतात. गाडीवर लावलेल्या या खुर्च्यांची विक्री करून मिळणाºया पैशातून घरातील कुटुंबाचे पोट भरणे एवढेच त्यांचे लक्ष असते. त्यातून मिळणारे उत्पन्न हे फारच नगण्य असते. गावोगावी जाऊन किती खुर्च्यांची विक्री होणार? याची माहिती असूनही ही मंडळी धोकादायक वाहतुकीचा आधार घेतात.