कलंबिस्तमधील गावकऱ्यांचा असाही आदर्श, निधीची वाट न बघता उभारली शाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 10:17 PM2020-09-25T22:17:06+5:302020-09-25T22:17:09+5:30
पण शासनाचे १४ लाख रुपयांचे अनुदान झुगारून गावक-यांनी स्वखचार्तून अवघ्या दोन महिन्यात शाळा उभारली आहे.
अनंत जाधव
सावंतवाडी : सह्याद्री पट्ट्यातील सैनिकी गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या कलंबिस्त गावातील गावक-यांनी एकत्र येत मराठी प्राथमिक शाळा उभारली आहे. विशेष म्हणजे केंद्र व राज्य सरकारकडून गावागावातील शाळा उभारणीला निधी अनुदान दिले जाते. पण शासनाचे १४ लाख रुपयांचे अनुदान झुगारून गावक-यांनी स्वखचार्तून अवघ्या दोन महिन्यात शाळा उभारली आहे.
गेल्या सात-आठ वर्षांपूर्वी याच शाळेचा शतक महोत्सव साजरा झाला आहे. शतक वर्षापूर्वीची शाळा नादुरुस्त असल्यामुळे प्रशासनाने पाडली होती. त्यानंतर या नवीन इमारत बांधण्यासाठी १४ लाख रुपये जिल्हा नियोजनकडून मंजूरही झाले. पण शाळा काही प्रशासनाने बांधलीच नाही. आज, उद्या शाळा सुरू होईल, अशी अपेक्षा गावकरी होते. हा सर्व राजकर्ते, प्रशासनाकडे धाव घेऊनही हाती काहीच मिळाले नाही. त्यामुळे अखेर गावातील गावकरी मानक-यांनी एकत्र येत स्व: कर्तृत्वावर शाळा उभारण्याचा निर्धार केला अन् प्रत्यक्षातही आणला आहे.
१९ सप्टेंबरला अखेर मराठी शाळेची नवीन इमारत उभी राहिली आहे. गावक-यांच्या एकीच्या पाठबळावर हे शक्य झाले आहे. शासनाचा निधी न वापरता गावात मराठी शाळा उभारण्याचा नवा अध्याय कलंबिस्त गावाने घालून दिला आहे. या गावच्या गावक-यांचे कौतुक होत आहे.