रेल्वे स्थानकात सरकत्या जिन्याचे आज उद्घाटन
By admin | Published: January 25, 2016 12:57 AM2016-01-25T00:57:25+5:302016-01-25T01:01:33+5:30
रत्नागिरीत तयारी पूर्ण : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू वास्कोमधून रिमोटद्वारे करणार प्रारंभ
रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकावर उभारण्यात आलेल्या सरकत्या जिन्याचे (ट्रॅव्हलेटर) उद्घाटन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आज, सोमवारी दुपारी १२ वाजता वास्को येथून रिमोटद्वारे करणार आहेत. त्यामुळे रत्नागिरी स्थानकावर उद्घाटनाची सर्व सज्जता ठेवली आहे. कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरीत उद्घाटन होत असलेला हा पहिलाच ट्रॅव्हलेटर आहे.
याबाबतची माहिती रविवारी कोकण रेल्वेचे रत्नागिरी क्षेत्रीय व्यवस्थापक बी. बी. निकम यांनी दिली. कोकण रेल्वेमार्गावरील रत्नागिरी हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. भौगोलिक रचनेमुळे या स्थानकावरील प्लॅटफॉर्म १२ मीटर्स खोलीवर तयार केला आहे. त्यामुळे प्रवाशांना जिन्याद्वारे प्लॅटफॉर्मवर ये-जा करावी लागते. याचा विचार करूनच हा ट्रॅव्हलेटर विमानतळावरील ट्रॅव्हलेटरच्या धर्तीवर उभारला आहे. रत्नागिरी रेल्वेस्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर तीन महिन्यांपूर्वीच सरकत्या जिन्याचे उद्घाटन प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले होते. गेल्या महिनाभरापूर्वीच टॅव्हलेटरचे काम पूर्ण केले होते. त्यामुळे त्याचे उद्घाटन कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी क्षेत्रिय व्यवस्थापक बी. बी. निकम व कोकण रेल्वेचे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)
तासात ९ हजार प्रवासी वाहतूक
या स्वयंचलित ट्रॅव्हलेटरवर साहित्यासह उभे राहिल्यानंतर प्रवाशांना न चालता स्थानकाच्या वरील भागात जाणे शक्य होणार आहे. एका तासात ९ हजार प्रवाशांची वाहून नेण्याची क्षमता या ट्रॅव्हलेटरमध्ये आहे. १ मीटर रुंद व २९.२६ मीटर एवढी याची लांबी आहे. उभारणीसाठी १ कोटी रुपयांचा खर्च आला असून त्याला आंतरराष्ट्रीय सुरक्षा दर्जा आहे. त्यासाठी १५ किलोवॅट क्षमतेची विद्युत मोटार असून थ्री फेज विद्युत जोडणीवर हा ट्रॅव्हलेटर चालणार आहे.