सावंतवाडी : पालकमंत्री दीपक केसरकर यांना सी-वर्ल्ड प्रकल्पाचे गांभीर्यच कळले नसून, ते थातूरमातूर उत्तरे देत आहेत. केपे-गोवा येथे राज्य शासनाने ९०० कोटी रुपये मंजूर केले असून, पुन्हा एवढा मोठा प्रकल्प सिंधुदुर्गात होणे शक्य नाही. यामुळे पालकमंत्री जर सी-वर्ल्ड करू पाहतात, तर निदान जमीन अधिग्रहण करावे. तरच जिल्ह्यातील जनतेचा विश्वास बसेल, असे काँग्रेस प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी सांगितले.येथील माजी खासदार नीलेश राणे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी दिलीप भालेकर, संतोष जोईल, सत्यवान बांदेकर, आदी उपस्थित होते. परुळेकर म्हणाले की, फडणवीस सरकारच्या मदतीने संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सी-वर्ल्ड प्रकल्प गोव्यात नेला असून, यासाठी ९०० कोटी रुपये केंद्र सरकारकडून मंजूरही झाले आहेत. तसेच चिपी विमानतळाची धावपट्टीही कमी करून मोपा विमानतळाला दर्जा दिला आहे. यामुळे सी-वर्ल्डसारखा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता होणे अशक्य आहे. पालकमंत्री केसरकर यांना खरोखरच सी-वर्ल्ड प्रकल्प जिल्ह्यात हवा असेल, तर त्यांनी जमीन अधिग्रहण करावे, असे स्पष्ट केले. सावंतवाडी शहरात तारा हॉटेल समोर नवीनच सुरू असलेल्या इमारतीचे बांधकाम अनधिकृत असून, नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे यांनी परवानगी दिलीच कशी? सर्वसामान्य जनतेला घर बांधतेवेळी रस्ता सोडण्यासाठी नगर पालिकेकडून दबाव आणला जातो. मात्र, या इमारतीकडून रस्त्यासाठी एक फूटही जागा सोडली जात नसून, त्याठिकाणी पायऱ्या बांधल्या आहेत. सावंतवाडी शहरात झाडांची तोड करून नवनवीन इमारती उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे सावंतवाडी शहराची परिस्थिती डोंबिवलीसारखी झाल्याची टीका परुळेकर यांनी केली. (वार्ताहर)
सी-वर्ल्डची जमीन अधिग्रहण करा
By admin | Published: June 16, 2016 9:46 PM