सव्वा लाखाच्या खैरासह ट्रक ताब्यात
By admin | Published: January 13, 2016 09:45 PM2016-01-13T21:45:32+5:302016-01-13T21:45:32+5:30
मुद्देमाल वन खात्याकडे : एडगाव तिठ्यावर पोलिसांची कारवाई
वैभववाडी : एडगाव तिठा येथे विनापरवाना खैराचे लाकूड वाहतूक करणारा रत्नागिरीतील ट्रक पोलिसांनी पकडला. या ट्रकमध्ये सुमारे सव्वा लाख किंमतीचे साडेचार टन खैराचे लाकूड आढळून आले. सकाळी नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी लाकडासह ट्रक वनखात्याच्या ताब्यात दिला.
परिविक्षाधिन उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश पालवे, उपनिरीक्षक आर. के. गुरव व पोलीस कर्मचारी एडगाव तिठा येथे नाकाबंदीला होते. त्यावेळी सकाळी सव्वा सातच्या सुमारास वैभववाडीहून उंबर्डेकडे जाणारा आयशर ट्रक (एम एच - 0८; डब्ल्यू- ८२१५) एडगाव तिठ्यावर पोलिसांच्या दृष्टीस पडला. ट्रकची तपासणी करताना खैराचे विनापरवाना सुमारे साडेचार टन लाकूड आढळले. त्यामुळे हा ट्रक पोलीस ठाण्यात नेण्यात आला.
रत्नागिरी - कुवारबाव येथील किरण प्रेमनाथ शिवगण (वय ३६) हा ट्रक चालवित होता. त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार ट्रकमध्ये १२0 मण खैराचे लाकूड होते. या ट्रकबाबत पोलिसांनी वनखात्याला माहीती दिल्यानंतर दुपारी वनपाल के. व्ही. सावंत यांनी खैराच्या लाकडासह ट्रक पोलीस ठाण्याच्या आवारातून ताब्यात घेतला.
या वषार्तील ही पहिलीच मोठी कारवाई असून या कारवाईमुळे खैराच्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. (प्रतिनिधी)