कणकवली : सांगली-मिरज येथून सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यातील फोंडाघाट, हवेलीनगर येथील पोकळे पेट्रोलियम येथे पेट्रोल, डिझेल घेऊन येणाऱ्या टँकर (क्रमांक एमएच- ०७-एक्स- १४७९) चा फोंडाघाटात दाजीपूर खिंडीच्याखाली एका वळणावर बुधवारी अपघात झाला होता. या अपघातानंतर टँकरने पेट घेतल्याने स्फोट झाला होता. या अपघातात टँकरचालक संदीप सुभाष इनामदार (वय ४४, रा. वाठार तर्फ वडगाव, ता. हातकणंगले, कोल्हापूर) यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडली.फोंडाघाट, हवेलीनगर येथे किरण प्रकाश पोकळे (वय ४५, रा. कासार्डे, जांभुळगाव) यांचा पोकळे पेट्रोलियम हा इंधनाचा पंप आहे. त्यांची पत्नी संतोषी हिच्या नावे अशोक लेलँड कंपनीचा टँकर (एम.एच.- ०७-एक्स- १४७९) आहे. त्यामधून पेट्रोल, डिझेल वाहतूक केली जात असे. त्या टँकरवर संदीप सुभाष इनामदार हे चालक म्हणून गेली चौदा वर्षे कामाला होते. २ नोव्हेंबर रोजी ते आपल्या घरी वाठार तर्फ वडगाव येथे गेले होते. त्यादिवशी तिथे मुक्काम केल्यावर ४ नोव्हेंबर रोजी मिरज डेपोतून त्यांनी टँकरमध्ये पेट्रोल व डिझेल भरले. तसेच फोंडाघाट येथे ते निघाले. किरण पोकळे यांनी त्यांना सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास फोन केला असता आपण राधानगरी येथे पोहोचलो असून, टँकरचे ब्रेक कमी लागत आहेत, पण आपण सावकाश येतो असे त्यानी सांगितले. काहीवेळाने पोकळे यांना एका पेट्रोल पंप मालकाचा फोन आला. त्यांनी तुमचा टँकर फोंडाघाटात एका वळणावर अपघातग्रस्त झाल्याचे सांगितले. त्यानंतर पोकळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता टँकरला आग लागली होती, तर संदीप इनामदार हे रस्त्याच्या बाजूला आगीत होरपळलेल्या स्थितीत पडले होते. त्यांची काहीच हालचाल होत नव्हती. काही लोकांनी पोलिस व रुग्णवाहिकेला बोलाविले. संदीप यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, ते मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
गुन्हा दाखलघटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक बंबांनी आग आटोक्यात आणली. त्यानंतर फोंडाघाट रस्त्यावरील वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली. या घटनेप्रकरणी पोलिसांनी टँकरचालक संदीप इनामदार यांच्यावर हयगयीने वाहन चालवून टँकरच्या नुकसानीस तसेच स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
घराबाहेर नागरिकांनी गर्दीदरम्यान, इनामदार कुटुंबीय मूळचे सातारा येथील असून गेली २० वर्षे ते वाठार (ता. हातकणंगले) येथील श्रीराम कॉलनीत राहतात. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी आहे. मुलगा अमेय (वय १९) महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे, तर मुलगी युगंधरा (१५) दहावीत शिकत आहे. इनामदार मृत झाल्याची बातमी टँकरमालकांनी त्यांच्या नातेवाइकांना दिली. बुधवारी रात्री उशिरापर्यंत पत्नी व मुलांना ही घटना स्पष्टपणे सांगितली नव्हती. यामुळे ते भांबावलेल्या अवस्थेत होते. श्रीराम कॉलनी येथे त्यांच्या घराबाहेर नागरिकांनी गर्दी केली होती.