सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७६ प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर केवळ दोनच शिक्षक या बदलीत जिल्ह्याला मिळणार आहेत. या बदलीचे आदेश ९ सप्टेंबर रोजी प्राप्त झाले असताना ११ सप्टेंबर रोजी यातील ४ शिक्षक कार्यमुक्त करण्यात आले. मात्र, याची साधी पूर्वकल्पना शिक्षण सभापतींना देण्यात आली नाही. त्यामुळे शिक्षण समिती सभेत सभापती डॉ. अनिशा दळवी यांच्यासह सभागृहाने तीव्र नाराजी व्यक्त केली. प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्या कार्यपद्धतीबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी पर्यायी शिक्षक मिळेपर्यंत या बदली झालेल्या शिक्षकांना न सोडण्याचा ठराव घेण्यात आला.जिल्हा परिषदेची शिक्षण समितीची तहकूब सभा येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात सभापती डॉ. अनिशा दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समिती सचिव तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, सदस्य सतीश सावंत, सरोज परब, सुनील म्हापणकर, राजेंद्र म्हापसेकर, राजन मुळीक, संपदा देसाई, उन्नती धुरी यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.आंतरजिल्हा बदलीचे शिक्षक सोडल्याने सतीश सावंत यांनी ह्यसभापतींनाच माहिती नसेल तर कसे चालेल ? असा प्रश्न उपस्थित करीत शिक्षक द्या, अन्यथा शाळा बंद करण्याचे आदेश द्या. केवळ नावाला शाळा सुरू ठेवू नकाह्ण असा ठराव घेऊन शासनाला पाठविण्याची सूचना केली. यावर सभापती डॉ. दळवी यांनीही ह्यमी ९ सप्टेंबर रोजी कार्यालयात आले. पुन्हा ११ रोजी आले होते. या दोन दिवसांत आंतरजिल्हा बदलीचे आदेश प्राप्त झाले.
या निर्णयाबाबत १० रोजी चर्चा झाली. ११ रोजी त्यावर मी येण्यापूर्वी अंतिम स्वाक्षरी झाली. त्यानंतर केवळ ही प्रक्रिया आपल्याला सांगितली गेली, असे सांगत नाराजी व्यक्त केली. शिक्षणाधिकारी आंबोकर यांनी अध्यक्षा संजना सावंत यांच्या दालनात त्यांच्यासमवेत उपाध्यक्ष रणजित देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी व आपल्यात चर्चा होऊन हजर झालेल्या ४ शिक्षकांच्या बदल्यात तेवढेच शिक्षक सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले.