शिक्षकी पेशाला कलंक; अल्पवयीन विद्यार्थीनीचा शिक्षकाने केला विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2018 09:14 PM2018-02-10T21:14:32+5:302018-02-10T21:15:28+5:30
शिक्षकी पेशाला कलंक लावणारी घटना वैभववाडी तालुक्यात समोर आली आहे. लोरे केंद्रातील चिंतामणी पवार या भजनसम्राट शिक्षकाने आपल्याच शाळेतील अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग केला.
वैभववाडी - शिक्षकी पेशाला कलंक लावणारी घटना वैभववाडी तालुक्यात समोर आली आहे. लोरे केंद्रातील चिंतामणी पवार या भजनसम्राट शिक्षकाने आपल्याच शाळेतील अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग केला. याबाबत पिडीत विद्यार्थीनीच्या आईने शनिवारी पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार नितीभ्रष्ट शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून तो पसार झाला आहे. या घृणास्पद प्रकाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चिंतामणी पवार हा शिक्षक 'त्या' शाळेत अनेक वर्षांपासून आहे. शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थ्यीनींना घेऊन तो रात्री भजने करतो. त्यामुळे पवार याने गावात आपली छाप निर्माण केली होती. परंतु, शाळेतील विद्यार्थीनींशी लगट करण्याची त्याची खोड पूर्वीपासूनच असल्याची चर्चा आहे. यापुर्वीही पवार यांने विद्यार्थ्यीनींशी गैरवर्तन केल्याच्या घटना हळूहळू चर्चिला जावू लागल्या आहेत. मात्र, बदनामीच्या भीतीने तक्रार द्यायला कुणीही पुढे आले नव्हते.
शनिवारी सकाळी मधल्या सुट्टीत त्याने 12 वर्षीय विद्यार्थीनीशी गैरवर्तन केल्याने पिडीत तिला मानसिक धक्का बसल्याने ती जोरजोरात रडू लागली. त्यामुळे सोबतच्या मुलीही रडायला रडायला लागल्या. त्यामुळे कलंकित पवारच्या कृष्णकृत्याचे बिंग फुटले. हा प्रकार गावात समजताच ग्रामस्थ शाळेत पोहोचले. तेथे पवारला प्रसाद दिल्यानंतर त्याने तेथून पळ काढला. त्यानंतर पिडीतेच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार चिंतामणी पवार याने यापुर्वीही गेल्या वर्षभरापासून पिडीत अल्पवयीन विद्यार्थीनीला त्रास दिल्याचे म्हटले आहे.
पिडीतेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित चिंतामणी पवार याच्याविरुध्द पोलिसांनी विनयभंगाचा तसेच बाल लैंगिक अत्याचार अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, चिंतामणी पवार दुपारपासून गायब झाला आहे. त्यामुळे उशिरापर्यंत तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. दरम्यान, शिक्षकांच्या एका संघटनेकडून हे प्रकरण दडपण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु होते. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक जयश्री भोमकर करीत आहेत.
सभापतींनी घेतलीय गंभीर दखल
विद्यार्थीनीचा विनयभंग झाल्याचे समजताच सभापती लक्ष्मण रावराणे यांनी तातडीने सकाळी शाळेत भेट दिली. त्यानंतर सायंकाळी सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन केराम यांना भेटून कडक कायदेशीर कारवाई करण्यास सांगितले. तसेच घृणास्पद प्रकाराबाबत संताप व्यक्त करीत सोमवारपासून चिंतामणी पवार विरुद्ध प्रशासकीय कार्यवाही सुरु केली जाईल, असे सभापती रावराणे यांनी स्पष्ट केले.