शिक्षकांच्या रिक्त पदांची समस्या जैसे थे!
By admin | Published: June 16, 2016 09:41 PM2016-06-16T21:41:32+5:302016-06-17T00:51:21+5:30
वेंगुर्लेत १३८ प्राथमिक शाळा : साडेचार हजार विद्यार्थी घेत आहेत शिक्षण
प्रथमेश गुरव -- वेंगुर्ले -दीड महिन्याच्या सुटीनंतर बुधवारी तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा विद्यार्थ्यांच्या प्रवेशाने गजबजल्या. शाळांमध्ये नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले, तर प्राथमिक शाळांमध्ये प्रभातफेऱ्या, दिंडी काढून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यात आली. वेंगुर्ले तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १३८ प्राथमिक शाळा असून, सुमारे साडेचार हजार विद्यार्थी या शाळांमधून शिक्षण घेत आहेत. मात्र, शिक्षकांच्या रिक्त पदांची समस्या चालू शैक्षणिक वर्षातही कायम आहे.
१५ जूनपासून प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत. शासनाच्या धोरणानुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके, सर्व मुली व अनुसुचित जाती जमातीतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले. इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या संख्यांमध्ये वाढ होत असली तरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये पटसंख्या टिकविण्यासाठी शासनाबरोबरच शिक्षक, शाळा व्यवस्थापन समित्या विविध उपक्रम राबविताना दिसत आहेत.
यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती, माता-पालक संघ, पालक-शिक्षक संघ विशेष प्रयत्न करीत आहेत. शासनाच्यावतीने शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. त्याचबरोबर अपंग विद्यार्थ्यांना सायकल, व्हीलचेअर, दृष्टीदोष असणाऱ्यांना चष्मे, आदी साहित्य शासनातर्फे विद्यार्थ्यांना पुरविले जाते. अशा अनेक सोयीसुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जात असल्याने इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे आकृष्ट होत असलेले विद्यार्थ्यांचे पालक प्राथमिक शाळांमध्ये आपल्या पाल्याला शिक्षणासाठी पाठवतील, असा विश्वास अधिकाऱ्यांना वाटतो.
प्राथमिक शाळांचा दर्जा चांगला असून, शिक्षकही चांगल्याप्रकारे मुलांना घडविण्याचे काम करतात. आता सर्व शाळांना सुसज्ज इमारती, स्वच्छतागृहे, खेळण्याचे साहित्य, कॉम्प्युटर अशा सुविधा शासनामार्फत पुरविण्यात आल्या आहेत. तसेच आता ज्ञानरचनावादी शिक्षणही या शाळांमध्ये सुरू झाले आहे. त्यासाठी इथल्या शिक्षकांना गडहिंग्लज, राधानगरी, सातारा या ठिकाणी
नेऊन त्यासंदर्भात प्रशिक्षण दिले आहे. अशाप्रकारे शासन विविध
उपक्रम राबवित असले तरी शिक्षकांच्या रिक्त पदांची समस्या मात्र कायम आहे.
वेंगुर्लेत ९३ पदे रिक्त
वेंगुर्ले तालुक्यात ७0 पदवीधर, ८ केंद्रप्रमुख, १३ उपशिक्षक, २ विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी अशी पदे रिक्त आहेत. सध्या एस. जी. गोडे हे वेंगुर्लेत प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून काम पहात आहेत. शासनाने या रिक्त पदांकडे लक्ष देण्याची गरज आहे. तरच जेमतेम पटसंख्या असलेल्या शाळांच्या पटसंख्येमध्ये आणखी वाढ होऊ शकते.
प्राथमिक शाळांमध्ये अभ्यासाबरोबरच सण, उत्सव, भारतीय परंपरा यांचीही जपणूक करणारे ज्ञान दिले जाते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या क्रीडा, सांस्कृतिक कलागुणांना वाव देण्याचे काम प्राथमिक शाळांमधून केले जाते. त्यामुळे आदर्श भावी पिढी घडविण्यात या शाळांचा मोठा वाटा आहे. पालकांनीही आपल्या पाल्याला मूळ ज्ञान मिळण्यासाठी प्राथमिक शाळांनाच प्राधान्य द्यावे.
- एस. जी. गाडे,
प्रभारी गटशिक्षणाधिकारी, वेंगुर्ले