सावंतवाडी : माझ्या व्यासपीठावर कोण बसले हे मला माहीत नाही. त्याची चौकशी केली जाईल. पण वाल्याचा वाल्मीकी झालेल्यांनी माझ्यावर टीका करावी हे हस्यास्पद आहे, असा टोला सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणेंना लगावला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली येथील एका हॉटेलमधून छोटा राजनच्या हस्तकाला सिंधुदुर्ग पोलिसांनी काल ताब्यात घेतले. ही कारवाई लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग पोलिसांनी केली. निलेश उर्फ पटल्या पराडकर असे त्याचे नाव आहे. तो कणकवलीतील एका हॉटेलमध्ये लपून बसला होता अशी माहिती पोलिसांनी दिली.
निलेश पराडकर हा कुख्यात गॅंगस्टर सिंधुदुर्गात शिवसेनेच्या प्रचारात राजरोस फिरत होता. मुंबई पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार असलेला गुंड पराडकर विनायक राऊत आणि गृहराज्यमंत्री केसरकर यांच्यासोबत शिवसेनेच्या प्रचारसभांमध्ये मांडीला मांडी लावून बसत होता. हा फरार गुंड सिंधुदुर्गत वावरत असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षकांना मिळताच त्यांनी आज रात्री ९ वाजता सापळा रचून कणकवलीतील एका हॉटेलमधून त्याच्या मुसक्या आवळल्या. पराडकरच्या नावावर खून, खुनाचे प्रयत्न, धमकी, खंडणी, अपहरण, विनयभंग असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.