रहिम दलाल - रत्नागिरी -जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येचा आढावा घेता शहरी व ग्रामीण भागासाठी ७८ प्रयोगशाळांची आवश्यकता असताना केवळ २२ प्रयोगशाळा सुरु आहेत़ त्यामुळे रुग्णांचे रक्त व थुंकी तपासणीसाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. जिल्ह्याला स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला असला तरी जनतेच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आरोग्य विभागाकडे पुरेशा प्रयोगशाळा नाहीत़ आरोग्य विभागाकडून जिल्ह्यात विविध योजना व कार्यक्रम राबविले जात आहेत. त्यावर शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येतात़ जिल्ह्यातील हजारो गोरगरीब रुग्ण आरोग्याच्या विविध योजनांचा लाभ घेत आहेत़ मागील काही वर्षातील जिल्ह्याच्या आरोग्याची स्थिती पाहता साथीच्या रोगांचा प्रसार फार अल्प प्रमाणात होत आहे. कारण जिल्ह्यात स्वच्छतेला जास्त महत्त्व दिले जात असल्याने रोगराई हा प्रकार दूरच आहे. त्यामुळे जिल्ह्याचे आरोग्य चांगले आहे, असे म्हणता येईल़ जिल्ह्यात ६७ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३७८ उपकेंद्र, १ जिल्हा शासकीय रुग्णालय, ३ उपजिल्हा रुग्णालये, ८ ग्रामीण रुग्णालये, १ क्षयरोग केंद्र आहे़ रत्नागिरीमध्ये एकमेव असलेले कुष्ठरोग रुग्णालय बंद होण्याच्या मार्गावर आहे़ या रुग्णालयांमध्ये गरीब व गरजू रुग्णांवर मोफत औषधोपचार केले जातात़ मात्र, कॅन्सर, हृदयरोग अशा रुग्णांवर औषधोपचार करण्यासाठी शासनाच्या एकाही रुग्णालयामध्ये तसे औषधोपचार केले जात नाहीत़ एकूणच क्षयरोग आणि मलेरिया यांसारख्या रोगांची तपासणी करण्यासाठी या रुग्णालयांमध्ये प्रयोगशाळा सुरु करण्यात आल्या आहेत़ त्याही हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच आहेत़ जिल्हा परिषदेच्या सर्वच ६७ प्राथमिक आरोग्य केंंद्रांसाठी प्रयोगशाळा मंजूर आहेत़ मात्र, प्रत्यक्षात १० प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येच प्रयोगशाळा सुरु आहेत़ त्याचबरोबर ८ ग्रामीण रुग्णालये, ३ उपजिल्हा रुग्णालये, १० प्राथमिक आरोग्य केंद्र आणि एक मलेरिया कार्यालय अशा एकूण २२ प्रयोगशाळा सुरु आहेत़ सुरु असलेल्या सर्वच प्रयोगशाळांमध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ कार्यरत आहेत़
तपासणीसाठी प्रयोगशाळाच नाहीत...
By admin | Published: May 24, 2015 11:30 PM