डेगवे-आंबेखणवाडीत माकडतापाचे आणखी तीन रुग्ण--
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2016 01:40 AM2016-06-16T01:40:19+5:302016-06-16T01:40:45+5:30
दोघांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर
बांदा : डेगवे-आंबेखणवाडी येथील सोनू हिरबा देसाई यांचा चार दिवसांपूर्वीच माकडतापाने मृत्यूू झाल्यानंतर डेगवेतील आणखीन दोेन व डिंगणे गावातील एक रुग्ण माकडतापाने बाधित असल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. या दोघांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दोडामार्ग तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार चिपळूणकर यांनी दिली आहे.
काही महिन्यांपूर्वी दोडामार्ग तालुक्यात माकडतापाने पहिला बळी घेतला होता. त्यानंतर माकडतापाचे रुग्ण दोडामार्ग तालुक्यात सापडले होते. डेगवे-आंबेखणवाडी येथील सोनू हिरबा देसाई यांचे शनिवारी ११ रोजी गोवा-बांबोळी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.
त्यांना माकडतापाची लागण झाल्याचे निदान झाले होते. तळकट आरोग्य केंद्राच्या कक्षेत सावंतवाडी तालुक्यातील असनिये, विलवडे, तांबोळी, डेगवे, मोरगाव, कोनशी, आदी गावे येतात. त्यामुळे खबरदारी म्हणून या गावांमधील रुग्णांची तपासणी करण्यात आली.
सद्य:स्थितीत डेगवे गावातील दोघा रुग्णांना माकडतापाची लागण झाली
असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे
डॉ. चिपळूणकर यांनी सांगितले. तसेच डिंगणे गावातील एक रुग्ण गोवा-बांबोळी येथे उपचार घेत असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
काजू हंगामात जंगलात काजू गोळा करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना या तापाची लागण होण्याचे प्रमाण हे
जास्त होते. माकडाच्या अंगावरील गोचिडींमुळे या तापाची लागण होते.
मात्र आता पावसाळा आल्याने माकडतापाचे रुग्ण हे कमी होणार असून, यामुळे लोकांनाही दिलासा मिळणार आहे. (प्रतिनिधी)